Join us

दिवाळीत होणार कांद्याचा वांधा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 3:30 PM

कधी निसर्गाची अवकृपा, निर्यातबंदी तर कधी निर्यात शुल्कात वाढ करून केंद्र सरकार निर्माण करत असलेल्या अडचणी. पण अडचणींना डगमगणार ...

कधी निसर्गाची अवकृपा, निर्यातबंदी तर कधी निर्यात शुल्कात वाढ करून केंद्र सरकार निर्माण करत असलेल्या अडचणी. पण अडचणींना डगमगणार तो शेतकरी कसला. तो एकप्रकारे जुगार खेळतो आणि दरवर्षी कांदा लागवड करतो. महागडी खते, बी-बियाणे, पाण्याचा प्रश्न यावर मात करत शेतात कष्ट करून चांगले पीक काढतो. मग, आपल्या ताटात तिखट, लाल कांदा येतो. यंदा मात्र कांद्याचा वांधा होऊ शकतो. जूनमध्ये पावसाचं आगमन झालं नाही. जुलैत तो काहीसा बरसला. ऑगस्ट मात्र कोरडा गेला आणि सप्टेंबरमध्ये काही भागांत दोन दिवस थोडाफार पाऊस झाला आणि आता पुन्हा गायब झालाय.

खरिपातील कांदा कोरडवाहू शेतकऱ्यांचे पीक म्हणून ओळखले जाते. मात्र, यंदा पावसाअभावी पीक करपून जात आहे. अनेक ठिकाणी लागवडीच झालेल्या नाहीत. जुलैमध्ये झाल्या त्यासुद्धा आता पावसाअभावी अडचणीत आल्या आहेत. सोलापूर, सातारा येथे सप्टेंबरमध्ये कांदा बाजारात येतो. त्यानंतर धुळे, मालेगाव, नाशिकचा कांदा बाजारात येतो. यंदा मात्र महाराष्ट्रात खरिपाचा कांदा कधी बाजारात येईल आणि उत्पादन किती होईल ? याचा अजूनही अंदाज बांधता आलेला नाही. अजूनही अनेक शेतकऱ्यांनी रोपे तशीच ठेवलेली आहेत. चांगला पाऊस झाल्यावर त्यांना लागवड करायची आहे. त्यामुळे रब्बीचा साठवलेला कांदा संपल्यानंतर दिवाळीत कांद्याचा वांधा होऊ शकतो.

 हे माहिती आहे का ?

■ रब्बी हंगामात २०२२-२३ मध्ये मार्च, एप्रिल महिन्यात अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले. साठवणूक क्षमता कमी झाली. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले.

■ चाळीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब होत असल्याने उच्च प्रतीचा कांदा कमी प्रमाणात बाजारात येत आहे.

■ खरीप हंगामात पावसाने मोठा खंड दिल्याने लागवड कमी होण्याबरोबरच पिके करपत आहेत. यंदा खरिपाचा कांदा बाजारात उशिरा दाखल होईल.

व्यापाऱ्यांची पुन्हा चांदी

कांद्यावर निर्यात शुल्क लागू केल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले. मात्र, बाजार समित्यांमध्ये आधी बंद पुकारला व्यापाऱ्यांनी, शेतकयांनीही त्यांना साथ दिली. मार्केट बंदमुळे त्या काळात पुरवठा थोडा कमी झाला. त्यामुळे नेहमीप्रमाणे व्यापायांनी त्यांच्याकडील कांदा देशभरात चढ्या दराने विकून अव्वाच्या सव्या नफा कमावला. याच्या सुरस कथा सध्या लासलगाव, पिंपळगाव परिसरात चर्चिल्या जात आहेत.

योगेश बिडवई, मुख्य उपसंपादक, मुंबई

टॅग्स :कांदाबाजार