मंचर : कांद्याचे बाजारभाव वाढल्याने चोरट्यांनी (onion theft) आता आपला मोर्चा कांद्याकडे वळविला आहे. कळंब, जि. पुणे येथील शेतकरी संजय उर्फ नागेश भालेराव यांच्या कळंबई गावठाण येथील कांदा बराखीची जाळी तोडून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे दहा ते बारा गोणी कांदा चोरून नेला आहे.
सकाळी शेतीवर फेरफटका मारण्यासाठी ते गेले असता ही घटना त्यांच्या निदर्शनास आली आहे. यामध्ये शेतकरी संजय उर्फ नागेश भालेराव यांचे अंदाजे २० ते २२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन चार दिवसापासून कांद्याला बाजार भाव वाढला आहे. कांद्याचे बाजारभाव सध्याच्या परिस्थितीत ३० ते ४० रुपये किलो दरम्यान गेले आहे. अज्ञात चोरटे हे आसपासच्या परिसरातील आणि माहितीचे असावेत असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
बाजारभाव वाढल्यामुळे अज्ञात चोरांनी कांद्याची चोरी केली असावी अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. शेतकऱ्यांचे शेतीमालाची सुद्धा चोरी होऊ लागल्याने शेतकरी हवालदील आणि चिंताग्रस्त झाले आहे. अशा चोरीच्या घटना घडू नये यासाठी शेतकरी बांधवांनी अधिकची खबरदारी घेणे गरजेचे आहे. सदर अज्ञात चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी आजूबाजूच्या वाडी वस्तीवर गस्त वाढवणे गरजेचे आहे.
रात्री अपरात्री हिडणाऱ्या अज्ञात टवाळखोरांना पोलिसांनी चोप देणे गरजेचे आहे. जेणेकरून अशा चोरीच्या घटना होण्यास आळा होऊ शकतो. कांदे चोरीला जाण्याची ही कळंब परिसरातील पहिलीच घटना आहे अशा घटना वारंवार होऊ नये यासाठी दिवसा वाडी वस्तीवर फिरणाऱ्या अज्ञातांवर शेतकऱ्यांनी लक्ष ठेवावे. तसेच पोलिसांनी सुद्धा गावोगाव रात्री गस्त करण्याचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. जेणेकरून चोरीच्या घटनांना आळा बसू शकतो अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे.