अनंत चतुर्दशीपासून लासलगाव बाजार समितीची उपबाजार समिती असलेल्या विंचूर बाजार समितीत कांदा लिलावांना सुरूवात झाली असून त्याला शेतकरी आणि व्यापाऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र दुसरीकडे मागील दहा दिवसांपासून संप पुकारलेले जिल्ह्यातील व्यापारी अजूनही संपावर ठाम आहेत. त्यामुळे विंचूर वगळता नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, येवला, मनमाड, उमराणे अशा महत्त्वाच्या बाजारसमित्यांमधील कांदा लिलाव सुरू होण्याची शक्यता सध्या तरी मावळली आहे.
कांदा निर्यात शुल्क सरकारने रद्द करावे यासह विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी संपावर गेले. त्यामुळे जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद होऊन शेतकऱ्यांची कोंडी झाली. या संपावर सुरूवातीला नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्या उपस्थितीत व्यापारी व शेतकऱ्यांची बैठक झाली. पण तिच्यात समाधानकारक तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर मुंबईला उपमुख्यमंत्री, अजित पवार, पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. पण तिच्यात तोडगा निघू शकला नाही, त्यामुळे त्याच दिवशी सायंकाळी केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्यासमवेतही बैठक झाली. त्यानंतरही व्यापारी आपल्या संपावर ठाम होते.
त्यानंतर काल २९ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे कृषीभवनला बैठक झाली. पण कांदा निर्यात शुल्क सध्या तरी रद्द करण्याबाबत या बैठकीत निर्णय झाला नाही. त्यामुळे कालपासूनच व्यापाऱ्यांमध्ये नाराजी होती. दरम्यान या संदर्भात आज पिंपळगाव येथे पुन्हा जिल्हा व्यापारी असोसिएशनची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत संप सुरूच ठेवण्याचे व्यापारी असोसिएशनने ठरवले आहे. त्यामुळे पुढील निर्णय होईपर्यंत विंचूर बाजारसमिती वगळता नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद राहणार आहेत.
विंचूरला लिलाव सुरू राहणारविंचूर येथील व्यापाऱ्यांनी मात्र मुंबई येथील मंत्रिपातळीवरच्या बैठकीनंतर कांदा लिलाव पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गुरुवार, गणेश विसर्जनापासून या ठिकाणी लिलाव सुरू असून पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला, तर काल शुक्रवार आणि शनिवार रोजी तब्बल १४९४ आणि १८८३ नग इतकी विक्री कांदा आवक या बाजारसमितीत झाली. भाव टिकून असल्याने शेतकरीही या ठिकाणी गर्दी करत असून मागील तीन दिवसात एकूण ४८५०० क्विंटल आवक या बाजारसमितीत झाली आहे.
दरम्यान उद्या रविवारी बाजारसमित्यांना सुटी आहे. त्यानंतर सोमवारपासून संपात सहभागी झालेले कांदा व्यापारी पुन्हा लिलाव सुरू करणार किंवा नाही, तसेच या संपाबाबत सरकार काय भूमिका घेणार याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.