दत्ता पाटील
तासगाव : बाजार समितीत बेदाणा विक्री व्यवस्थेत अडते, व्यापाऱ्यांकडून प्रत्येक टप्प्यावर उत्पादकांची लूट होत असताना, जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे मौन शेतकऱ्याच्या मुळावर आले आहे.
या लुटीविरोधात तासगाव तालुक्यात तिसऱ्या आघाडीने आंदोलनाचा एल्गार केला आहे. उधळण थांबवून ऑनलाइन सौदे घेऊन बिलही ऑनलाइन बैंकिंगने देऊन, पारदर्शी व्यवहाराद्वारे लुटीला पायबंद घालणे शक्य आहे; पण सगळ्यांचेच हात गुंतलेले असल्यामुळे परिवर्तन करणार कोण? हा प्रश्न आहे.
तासगाव बाजार समितीत वर्षाला चौदाशे कोटीची उलाढाल असणाऱ्या सौद्यांत बेदाणा उत्पादकांना लुटीसाठी अनेक पळवाटा तयार झाल्या आहेत. बेदाणा सौद्यात होणाऱ्या उधळणी उजळणीपासून मिळणाऱ्या बिलापर्यंत प्रत्येक टप्प्यावर उत्पादकाच्या लुटीचे अनेक फंडे चालतात.
यातून अडते, व्यापारी, खरेदीदार करोडपती झाले आहेत. मात्र उत्पादक कंगाल राहिला आहे. नजरेसमोर होणारी फसवणूक दिसत असूनही त्यावर अंकुश ठेवण्यात बाजार समितीला अपयश आले आहे. इतकेच नव्हे तर मतासाठी शेतकऱ्यांच्या दारात जाणाऱ्या लोकप्रतिनिधींचेही याबाबत सोयीस्कर मौन आहे.
व्यापाऱ्यांचे राजकीय हितसंबंध आणि आर्थिक लागेबांधे, यामुळे लोकप्रतिनिधींचे मौन बेदाणा उत्पादकांच्या मुळावर उठले आहे. त्यामुळे याविरोधात दाद मागायची तरी कोणाकडे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
प्रस्थापित लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या लुटीकडे दुर्लक्ष केले असले तरी, तासगाव तालुक्यातील तिसऱ्या आघाडीने मात्र आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. बेदाणा उत्पादकांची लूट थांबेपर्यंत तीव्र लढा देण्याचा निर्धार करण्यात आला.
सौदे ऑनलाइन झाल्यास उधळण पूर्णपणे थांबून लुटीला लगाम बसू शकतो. आर्थिक व्यवहार ऑनलाइन करून नियमावली तयार केली, तर वटाव कपातीच्या माध्यमातून होणाऱ्या लुटीला लगाम बसू शकतो.
सौद्याचा कारभार पारदर्शक ठेवल्यास शेतकऱ्यांची लूट पूर्णपणे थांबण्यास मदत होऊ शकते; पण हा बदल करणाऱ्या व्यवस्थेचेच हात दगडाखाली असल्यामुळे बदल करणार कोण? हा प्रश्न आहे.
बेदाणा उत्पादकाच्या लुटीचे असेही काही फंडे
• बेदाणा सौद्याच्यावेळी उत्पादक हजर नसतो. अडत्याच्या भरवशावरच दर ठरवला जातो.
• शेतकऱ्याच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन अडत्यांकडूनच कमी भावात सौदा करून अन्य नावाने जादा दराने विक्रीचे प्रकार होतात.
• अनेकदा सौदा एकाच्या नावावर तर बिल दुसऱ्याच्या नावावर काढल्याच्याही तक्रारी आहेत.
• बड्या व्यापाऱ्यांकडून काळा बेदाणा सौद्यात विक्री न करता कमी दराने परस्पर दर ठरवून विक्री केल्याचे दाखवले जाते.
व्यापाऱ्यांच्या हातचे बाजार समिती 'बाहुले
दोन दिवसांपूर्वी माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीतच बारामती बाजार समितीचे माजी सभापती सुनील पवार यांनी बेदाण्याचे सौदे ऑनलाइन करायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. इतकेच नव्हे तर २४ तासांत शेतकऱ्याला पेमेंट मिळणे अशक्य नसल्याचेही सांगितले, मात्र, बाजार समिती प्रशासन व्यापाऱ्यांच्या हातातील बाहुले बनल्याने हा बदल घडणार कधी, हा प्रश्न आहेच.