जितेंद्र दखने
अमरावती : हंगामाच्या सुरुवातीला आणि अखेरीस दर वाढतील अशी संत्रा बागायतदारांची अपेक्षा यंदा फोल ठरली आहे. त्यामुळेच आंबिया बहारातील सुमारे ३० हजार टन संत्रा विक्रीअभावी झाडावरच असल्याची माहिती महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांनी दिली.
सध्या संत्रा फळांना २० ते २५ रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. विशेष म्हणजे सद्यस्थितीत संत्र्याला किमान ३५ हजार रुपये टनाचा भाव मिळणे अपेक्षित होते. मात्र हा भाव मिळत नसल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
राज्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर संत्रा लागवड असून त्यापैकी १ लाख हेक्टर क्षेत्र एकट्या अमरावती जिल्ह्यात आहे. नागपूरमध्ये ३० हजार, तर उर्वरित महाराष्ट्रात ४० हजार याप्रमाणे ६० हजार क्षेत्र विभाजित आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या भागातील संत्र्याचा दर्जा हा इतर भागापेक्षा चांगला असल्याने या भागातील संत्र्याला मागणीदेखील अधिक असते. त्यातही अंजनगाव सुजी, अचलपूर (अमरावती), बुलडाणा, अकोट (अकोला) या भागांतील संत्रा काढणीस लवकर येतो.
तर उर्वरित भागात सप्टेंबर अखेरीस आंबिया बहारातील फळे काढणीस येतात. परिणामी, लवकर काढणीस येणाऱ्या बागायतदारांना चांगला दरही मिळतो. आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांची मागणी सुरुवातीच्या आंबट-गोड चवीच्या संत्रा फळांची मागणी असते. त्याचाही परिणाम दरावर होतो. याशिवाय बांगलादेशात दरदिवशी जवळपास ५० हजार टन संत्र्याची निर्यात होत असे आता मात्र आजघडीला ही मागणी निम्म्यावर आली आहे.
परिणामी संत्र्याला समाधानकारक दर मिळत नसल्याचे बोलले जाते. मोर्शी, वरुड, जलालखेडा भागांतील बागायतदार हंगाम अखेरीस दर वाढतील या अपेक्षेने फळ काढणी उशिरा करतात.
हंगामा अखेरीस फळातील गोडवा वाढतो. अशा फळांना काही राज्यांची मागणी असते. आंबिया बहारातील चार लाख टन उत्पादनांपैकी यंदाही ३० हजार टन संत्रा दरवाढीच्या अपेक्षेने झाडांवर आहे. दर २० ते २५ रुपये प्रतिकिलोवर स्थिर असल्यामुळे बागायतदारांची अडचण वाढली आहे. यापेक्षा अधिक दर मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे.
संत्र्याला चांगला भाव मिळावा याकरिता देशाअंतर्गत संत्रा बाजारपेठा विकसीत करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. सोबतच संत्रावर प्रक्रिया करणारा प्रकल्प आजही विदर्भात नाही. परिणामी संत्रा उत्पादकांना समाधानकारक दर मिळत नाही. संत्राच्या बाजारपेठेत माल पोहोचविण्यासाठी आवश्यक दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. - श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज
दरवर्षी हंगामाअखेरीस संत्रा विक्रीवर संत्रा बागायतदाराचा भर असतो. यावेळीसुद्धा संत्र्याला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. अजूनही काही संत्रा बागायतीत संत्रा फळे झाडावर आहे. भावावाढीच अपेक्षा होती. मात्र यात निराशा झाली आहे. आजघडीला २० ते २५ हजार रुपये दराने संत्र्याला मागणी केली जात आहे. - श्रीपाद पाटील, संत्रा उत्पादक