रत्नागिरी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले भात शासनाकडून Bhat Hami Bhav हमीभाव देऊन खरेदी करण्यात येते. यावर्षी भाताला प्रति क्विंटल २३०० रुपये दर जाहीर झाला आहे. अद्याप शेतकरी भात कापणीच्या कामात व्यस्त आहेत.
शासनाने भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. नोंदणी करणाऱ्यांनाच भात विक्री करता येणार आहे. त्यामुळे दि. १५ डिसेंबरपर्यंत नावनोंदणीची सूचना करण्यात आली आहे.
भात उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वतःसाठी भात ठेवून उर्वरित भाताची विक्री करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळतात. भात नोंदणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावीच लागणार आहे.
भात कापणीची कामे सुरू असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही. त्यामुळे नोंदणी न करणारे शेतकरी भात विक्रीपासून वंचित राहू शकतात. ग्रामीण भागात ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी इंटरनेटचा व्यत्यय येत आहे.
भाताला २३०० रुपये दर
शासनाकडून यावर्षी भातासाठी प्रतिक्विंटल २३०० रुपये दर जाहीर केला आहे. भात विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पैसे जमा होता. त्यामुळे स्वतःसाठी भात ठेवून उर्वरित भाताची विक्री करणे शक्य आहे. गतवर्षी प्रति क्विंटल २१८३ रुपये दर होता. यावर्षी दरात वाढ झाली आहे.
ऑनलाइन नोंदणी आवश्यक
जे शेतकरी भात विक्री करणार आहेत, त्यांनी जवळच्या केंद्रावर जाऊन नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी करताना शेतकऱ्यांनी सातबारा, आधारकार्ड, बँकेचे पासबुकची झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात १४ केंद्र
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १४ भात संकलन केंद्र असून, त्या केंद्रावरच भात खरेदी केली जाणार आहे.
शासनाकडून दरवर्षी भाताला हमीभाव जाहीर केला जातो. भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना दि.१५ डिसेंबरपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करावी. - डी. आर. पाटील, अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन, रत्नागिरी