पणन हंगाम २०२३-२४ करिता केंद्र शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान/भरडधान्य खरेदी करण्यासाठी ९ नोव्हेंबर, २०२३ रोजी शासन आधारभूत निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत प्रसिद्धीपत्राद्वारे कळविण्यात आले आहे. २१८३ रुपये आधारभूत किमतीने या भात खरेदीबाबत ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. धान व भरडधान्य खरेदीचा कालावधी यामध्ये खरीप पणन हंगामातील धान पिकाचा खरेदी कालावधी ९ नोव्हेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ तर भरडधान्याचा खरेदी कालावधी १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ असा आहे.
मार्गदर्शक सूचना:- नवीन खरेदी केंद्रे व खरेदी संस्था निवडीबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे.- यात जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असणार असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा पुरवठा अधिकारी हे सदस्य तर जिल्हा पणन अधिकारी हे सदस्य सचिव असणार आहेत.- खरेदीसाठी प्रत्येक गाव एका विशिष्ट खरेदी केंद्रास जोडण्यात यावे. - खरेदी केंद्रांना जोडलेल्या गावांचे क्षेत्र व गावनिहाय शेतकऱ्यांची यादी तलाठ्याकडून प्राप्त करून घेऊन त्याची नोंद ठेवण्यात यावी.- शेतकऱ्यांकडील भात खरेदी करताना ऑनलाइन खरेदी पद्धत सुरू केली आहे. संबंधित शेतकऱ्यांची नोंदणी आवश्यक आहे.- त्याकरिता ऑनलाइन नोंदणी, आधार क्रमांक, बचत बँक खाते क्रमांक नोंदणी कण्यात येत आहे.- केंद्रशासनाने निर्धारित केलेल्या ३ नवीन मिनीमम थ्रेशोल्ड पॅरामीटर नुसार शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी ही आधार प्रमाणीकरण पद्धत वापरूनच करण्यात यावी.
वर्गवारी करून माहिती द्यावी- यासाठी आवश्यक असलेली आधार प्रमाणीकरण यंत्र सर्व केंद्रांना उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी ही मुख्य अभिकर्ता यांची असणार आहे.- तसेच केंद्र शासनाच्या यापूर्वीच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांची सीमांत, लघु, मध्यम, मोठे शेतकरी अशी जमीनधारणेवर आधारित तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर व अवर्गीकृत अशी वर्गवारी करून माहिती देण्याची विनंती राज्य शासनाने केली आहे.
शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये म्हणून केंद्र शासनाने हंगाम २०२३-२४ करीता पुढीलप्रमाणे आधारभूत किंमती जाहीर केल्या आहेत. यात भात, ज्वारी (संकरीत), ज्वारी (मालदांडी), बाजरी, मका, रागी इ. पिकांचा समावेश आहे.