तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश असलेल्या भारताने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे इतर देशांनी आता तांदळासाठी पाकिस्तानकडे मोर्चा वळविला आहे. परिणामी पाकिस्तानी तांदळाला जगात मागणी वाढली असून मागच्या १६ वर्षांत पाकिस्तानला तांदळाचा सर्वाधिक चांगला भाव मिळताना दिसत आहे. लवकरच पाकिस्तानची तांदुळ निर्यात विक्रमाचा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानमधून होत असलेल्या विक्रमी तांदुळ निर्यातीमुळे अनेक देशांतील तांदळाची टंचाई कमी होण्यास मदत झाली आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या कमी होत चाललेल्या परकीय चलनाच्या साठ्यालाही दिलासा मिळाला असून पाकिस्तानला आयातीसाठी निधी उभारण्यास मदत झाली आहे.
जागतिक तांदूळ व्यापारात भारताचा वाटा ४० टक्के आहे. मात्र कांद्यासह अनेक प्रकारच्या खाद्यान्नावर निर्यातबंदी घालण्याचे पाऊस भारताने उचलले. त्यानुसार बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. याशिवाय परमल तांदळाच्या निर्यातीवरही शुल्क लावण्यात आले.
त्याचा फायदा पाकिस्तानला होत असून यंदा २०२३-२४मध्ये पाकिस्तानची तांदुळ निर्यात ५० लाख टनांवर वाढू शकते असे येथील व्यापार प्रतिनिधींचे म्हणणे आहे. सध्या पाकिस्तानातून दररोज तांदळाची परकीय मागणी वाढताना दिसत असल्याचे निरीक्षणही स्थानिक व्यापारी-निर्यातदार नोंदवित आहेत.