पंढरपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सहा अडत्यांना बेदाण्याचे सौदे करण्यास आठ दिवसांसाठी बंदी केली आहे. बाजार समितीने संबंधित अडत्यांना तशी नोटीसही दिली आहे.
दरम्यान बाजार समितीच्या या निर्णयामुळे सुमारे ३०० हून अधिक शेतकऱ्यांच्या बेदाण्याचे मंगळवारी सौदे झाले नाहीत. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
बाजार समितीच्या आवारामध्ये दर मंगळवारी आणि शनिवारी बेदाणा सौदे बाजार भरतो, बाजारातील स्थानिक अडत्यांकडे शेतकरी बेदाणा विक्रीसाठी आणतात.
बाजार समितीमधील सहा अडत्यांचे मंगळवारी सौदे झाले नाहीत. त्यामुळे माढा, पंढरपूर, सांगोला या भागातून आलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या बेदाण्याचे सौदे झाले नाहीत. त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला आहे. बेदाणा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत.
शेतकऱ्यांना पैशाची निकड आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आपला तयार झालेला बेदाणा मार्केटमधील अडत्यांकडे विक्रीसाठी ठेवला आहे. निर्णयामुळे या सुमारे ३०० हून अधिक शेतकऱ्यांच्या बेदाण्यचे लिलाव झाले नाहीत.
सहा अडत्यांना १८ ते २९ मार्चपर्यंत सौदे बाजार बंद ठेवण्याची लेखी नोटीस बाजार समितीने दिली आहे. हा निर्णय बेदाणा असोसिएशनच्या बैठकीनुसार व त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार घेण्यात आल्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे.
सध्या बाजारात चांगला भाव मिळत असताना आज अनेक शेतकऱ्यांच्या बेदाण्याचे सौदे झाले नाहीत. समितीने घेतलेल्या या निर्णयाबद्दल नितीन कापसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
यांना दिली नोटीस
कन्हैया ट्रेडर्स, आदित्य एंटरप्राइजेस, विराज ट्रेडिंग कंपनी, पद्मिनी कोल्ड स्टोरेज, लक्ष्मी ट्रेडर्स, प्रदीपकुमार ताराचंद फडे.
सौदे बाजाराची वेळ वाढविण्यासाठी काही अडत्यांना आठ दिवस सौदे बंद करण्याची नोटीस दिली आहे. आठ दिवसानंतर त्यांचे सर्व व्यवहार सुरळीत सुरू होणार आहेत. - हरीष गायकवाड, सभापती, बाजार समिती, पंढरपूर
कृषी उत्पन्न बाजार समितीकडून ६ अडत्यांना सौदे बंद करण्याबाबत सूचना केल्या आहेत. यामुळे कोणतीही पूर्वसूचना न देता, अथवा प्रत्यक्ष मिटिंगमध्ये म्हणणे मांडण्यास संधी न देता, दुकानाचे सौदे बंदबाबत घेतलेल्या निर्णय हा फक्त अडत्याचाच नुकसान करणारा नसून सर्व शेतकऱ्यांच्या शेतमालाचे लाखो रुपयाचे नुकसान करणारा आहे. या संदर्भात पणन मंत्र्यांकडे तक्रार करणार आहे. - नितीन कापसे, बेदाणा उत्पादक शेतकरी
अधिक वाचा: Bedana Bajar Bhav : सांगली मार्केटमध्ये बेदाण्याच्या दरात वाढ; कोणत्या बेदाण्याला किती दर?