नासीर कबीरकरमाळा : बाजारात पेरूची आवक वाढल्याने पेरूचे दर गडाडले असून, पाच ते दहा रुपये किलोवर दर आल्याने तालुक्यातील पेरू उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे.
उत्पादन खर्चा इतके ही पैसे मिळत नसल्याने पेरू उत्पादक चिंतेत आहेत. करमाळा तालुक्यातील शेतकरी पारंपरिक पिके न घेता वेगवेगळ्या फळ पिकांकडे वळत आहेत.
गेल्या पाच-सहा वर्षांपासून तालुक्यातील पेरू पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ होत असून, तालुक्यातील शेतकऱ्यांनी छत्तीसगड येथून व्ही.एन.आर, गुजरात येथून गुजरात रेड, तर राज्यातील स्थानिक नर्सरीमधून तैवान पिंक जातीच्या पेरूची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे.
या पिकासाठी द्राक्ष व डाळिंब यांच्या तुलनेत किटकनाशक औषध यांचा खर्च कमी असला, तरी याच्या प्रत्येक फळाला क्रॉप कव्हर व प्लॅस्टिक बॅग वापरावी लागत असल्याने याचा व मजुरीचा खर्च मोठा आहे.
आजपर्यंत चाळीस-पन्नास रुपये किलो पेक्षा जादा दर मिळत असल्याने पेरू उत्पादक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत होते, परंतु सध्या बाजारात पेरूची आवक वाढल्याने सध्या मिळेल त्या दराने पेरू विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
भाव पडल्याने केळी प्रमाणे पेरूसाठी नवीन बाजारपेठ शोधण्याची गरज निर्माण झाली असून, देशातील विविध बाजारपेठांत पेरू पाठवण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.