Join us

Pigeon Pea Market : शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण; तुरीचे भाव घसरले; डाळींचे भाव मात्र गगनाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 10:37 AM

तुरीच्या दरात (Tur Market) घसरण होत असून नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर खाली आले आहेत. याउलट तूरडाळ (Tur Dal) मात्र १७५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या (Festivals) दिवसांमध्ये सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. दुसरीकडे तूर उत्पादक शेतकऱ्यांतही (Farmers) निराशेचे वातावरण असल्याचे दिसत आहे.

खामगाव : तुरीच्या दरात घसरण होत असून नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर खाली आले आहेत. याउलट तूरडाळ मात्र १७५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. दुसरीकडे तूर उत्पादक शेतकऱ्यांतही निराशेचे वातावरण असल्याचे दिसत आहे.

गतवर्षी देशांतर्गत तुरीच्या उत्पादनात प्रचंड घट आली होती. त्यामुळे तुरीच्या दरात प्रचंड तेजी आली. एप्रिल-मेदरम्यान तुरीच्या दराने १३ हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा ओलांडला होता.

दरातील तेजी पाहता शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात तुरीचा पेरा वाढविला. जुलैमधील अपवाद वगळता या पिकाला पोषक वातावरण मिळाले. त्यामुळे पिकाची स्थिती उत्तम आहे. तथापि, बाजार समित्यांत मात्र तुरीचे दर सतत घसरू लागले आहेत. गत आठवड्यापर्यंत १० हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केली जाणारी तूर आता थेट नऊ हजारांच्या खाली घसरली, तर तुरीच्या डाळीचे दर मात्र पावणेदोनशे रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.

बाजार व्यवस्थेकडूनही सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांची एकप्रकारे लूटच सुरू असल्याने रोष व्यक्त होत आहे, येत्या महिनाभरात तुरीचे पीक हाती येणार असतानाच घसरण होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

सध्या शेतकऱ्यांकडे तूर नसली तरी येत्या दीड महिन्यात तूर काढणीला सुरुवात होणार आहे. यापूर्वीच दरात घसरण सुरू झाल्याने दर आणखी खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. - श्रीकृष्ण जाधव, शेतकरी.

बुलढाणा जिल्ह्यात ८८ हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी

■ गत हंगामात तुरीला चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात तुरीची पेरणी वाढविली.

■ कृषी विभागाच्या अहवालानुसार यंदा जिल्ह्यात ८८ हजार ८०३ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे.

■ येत्या महिना, दीड महिन्यात हे पीक काढणीवर येणार असतानाच दरात घसरण सुरु झाली आहे.

तूरडाळीचे दर पावणेदोनशे रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. इतरही डाळीच्या दरात वाढ झाल्याने आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. - मंगला राऊत, गृहिणी.

'या' लिंक वर क्लिक करून आजच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा, आणि मिळवा सर्व अपडेट सर्वात आधी अगदी मोफत.

टॅग्स :तूरबाजारशेतकरीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबुलडाणाशेती क्षेत्र