मागील काही दिवस बाजार समित्यांत तुरीच्या दरात चढउतार होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शुक्रवार आणि शनिवारी आठवड्याच्या अखेरच्या दिवशी मात्र तुरीच्या दरात काहीशी सुधारणा झाल्याचे लिलावातील आकडेवारीतून दिसले. त्यामुळे तूर साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. बाजारात तुरीची आवक मात्र अत्यंत कमी आहे.
गत हंगामात देशांतर्गत तुरीचे उत्पादन घटले असतानाच साठाही अत्यल्प होता. त्यामुळे तुरीच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आणि तुरीचे दर १३ हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत पोहोचले होते. दरवाढीच्या अपेक्षेने तूर साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना या दरवाढीचा फायदा झाला.
मार्च ते एप्रिलदरम्यान तुरीतील तेजी कायम होती. त्यानंतर दरात घसरण होऊन तुरीचे दर १२ हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत आले. त्यानंतर मे आणि जूनपासून तुरीच्या दरात आणखीच घसरण होत गेली आणि तुरीचे दर १० हजार ५०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत घसरले होते.
दरात घसरण होत असल्याने काही शेतकऱ्यांनी तुरीची विक्री थांबविली. दरम्यान, जिल्ह्यात जुलैमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे तुरीचे पीक संकटात सापडले आणि बाजारात तुरीच्या दरातील घसरण थांबली. गत आठवड्यापर्यंत १० हजार ५०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत घसरलेले तुरीचे दर
शनिवारी काहीसे सुधारले. तथापि, वाशिम बाजार समितीत शुक्रवारी तुरीला १० हजार ९०० रुपये प्रती क्विंटलपर्यंतचेच दर मिळाले होते. शनिवारी मात्र कारंजा बाजार समितीत तुरीच्या दरात चांगली सुधारणा झाली.
जिल्ह्यात ६४,६१० हेक्टरवर पेरणी !
गत हंगामाच्या सुरुवातीपासून तुरीला चांगला दर मिळाला. त्यामुळे या पिकावर शेतकऱ्यांचा यंदा अधिक भर दिसून आला. जिल्ह्यात सरासरी ५८ हजार ६१० हेक्टर क्षेत्रावर तुरीचा पेरा अपेक्षित असताना यंदा जवळपस ६४ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी केली आहे. आता मात्र तुरीच्या दरात चढउतार होत असल्याने शेतकऱ्यांत संभ्रमाचे वातावरण आहे.
कारंजात मिळाला ११,२५५ रुपये प्रती क्विंटलचा दर
कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी तुरीला ११ हजार २५५ रुपये प्रती क्विंटलपर्यंतचा दर मिळाला. गत आठवडाभरात जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीला मिळालेले हे सर्वोच्च दर आहेत. दरवाढीच्या अपेक्षेने अद्यापही तूर साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या आशा यामुळे उंचावल्या असून, आता पुढील आठवड्यात तुरीला किती दर मिळतात याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.