तुरीचे हमीभाव ७ हजार असताना (Tur price), सध्या बाजारात अधिकतम १२,५०० रुपये क्विंटलप्रमाणे विकली जात आहे. साहजिकच डाळदेखील कडाडली आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक कमी झालेली आहे व त्यामुळे साठेबाजी होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
हंगामापासून म्हणजेच साधारण फेब्रुवारी महिन्यापासून हमीभाव ७ हजार रुपये क्विंटल असताना ९ हजारांवर भाव मिळालेला आहे. आता मार्केटमध्ये आवक कमी झाल्याने मागणी वाढून तुरीला १२ हजारांवर भाव मिळत आहे. शनिवारी अमरावती बाजार समितीमध्ये तुरीच्या ३६२५ पोत्यांची आवक झाली व ११,७०० ते १२,२०० रुपये भाव मिळाला आहे. पेरणीच्या तोंडावर तुरीच्या दरात पुन्हा अंशतः दरवाढ होण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
गतवर्षीच्या खरिपामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसामुळे तुरीच्या उत्पादनात कमी आलेली आहे. केवळ अमरावती जिल्ह्यातच नव्हे सर्वत्र तुरीच्या पिकांचे नुकसान झाले. शिवाय पीक फुलोरा व बहरावर असताना, ढगाळ वातावरण व पावसाने कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला.
त्याचाही उत्पादकतेवर परिणाम झाला. अशा परिस्थितीत चांगला भाव मिळत असल्याने दरवाढीच्या फंदात न पडता बहुतेक शेतकऱ्यांनी तुरीची साठवणूक केलेली नाही. शेतकऱ्यांकडे तूर नसल्याने सध्याच्या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच होत असल्याची स्थिती आहे.
तुरीचे दर (रुपये/क्विंटल)
०८ मे | ११,००० ते ११,४०० |
१३ मे | ११,००० ते ११,७८० |
१७ मे | ११,७०० ते १२,००० |
२० मे | ११,६०० ते १२,०६० |
२९ मे | ११,८०० ते १२,४९१ |
साठेबाजीची भीती
गतवर्षी खरिपात तुरीचे सरासरी उत्पादन कमी झाले. हंगामात एमएसपीपेक्षा दोन हजार रुपये जास्त भाव मिळाला. त्यानंतर तुरीच्या दरात वाढ होत असल्याने मोठ्या व्यापाऱ्यांद्वारा तुरीच्या साठेबाजीची शक्यता आहे. त्यामुळे आवक कमी होऊन तुरीच्या डाळीचेही दर वाढले आहेत.
खरिपात पेरणी पण रब्बीत काढणी
तुरीची पेरणी खरिपात होत असली, तरी पैसेवारीत तुरीला रब्बीचे पीक गृहीत धरण्यात येते, तुरीची काढणी व हंगाम रब्बी हंगामात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात सुरू होतो. त्यामुळे नवीन तूर मार्केटमध्ये यायला किमान नऊ महिन्यांचा अवधी आहे. त्यापूर्वी जानेवारीत कर्नाटकमधील तूर बाजारात येते.
तुरीच्या उत्पादनात कमी आली आहे. सर्वत्र अशीच स्थिती असल्याने मार्केटमध्ये आवक कमी झाली. पर्यायाने मागणी वाढून दरवाढ झाली. नवीन तुरीला नऊ महिन्यांचा अवधी आहे. - रमेश कडू, व्यापारी.
हेही वाचा - Success Story आंब्याने दिली सुखाची दिशा; प्रगतीशील मिठ्ठू काकांची ही यशकथा