आटपाडी : आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सौदे बाजारात दर्जेदार डाळिंबाला उच्चांकी प्रतिकिलो ५५१ रुपये दर मिळाला. यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. सौद्यातील विक्रमी दरानंतर शेतकऱ्याने फटाके वाजवत आनंद व्यक्त केला.
आटपाडी बाजार समितीच्या सौदे बाजारामध्ये राज्याच्या विविध जिल्ह्यातून शेतकरी व व्यापारी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. परिणामी, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळतो. मंगळवारी आटपाडीच्या बाजारामध्ये नातेपुते (जि. सोलापूर) येथील शिवलिंग माने यांच्या उत्कृष्ट डाळिंबाला प्रतिकिलो ५५१ रुपये भाव मिळाला.
बाजार समितीमध्ये सीताफळ, आंबा, पेरू, डाळिंब यासह अन्य फळ पिकाचे सौदे सुरू आहेत. दररोज सुरू असणाऱ्या डाळिंब सौदे बाजारामध्ये सरासरी ३ ते ४ हजार क्रेट डाळिंबाची आवक होते. यामध्ये शेतकऱ्यांच्या मालाची प्रतवारी निश्चित केली जाते.
प्रतवारीनुसार सौदे केले जातात. माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील शिवलिंग माने यांच्या डाळिंबाला दर्जानुसार प्रतिकिलो ५४, ८६, ११३, १४०, ५५१ रुपयापर्यंत दर मिळाला. पिलीव (जि. सोलापूर) येथील जहांगीर शमसुद्दीन मुलाणी यांच्या मालास ६८, ९९, १४६, २००, २६४ रुपये दर मिळाला.
माळशिरस (जि. सोलापूर) येथील बांगदेव वाघमोडे यांच्या मालाला ५७, ८६, १०४, १३६, १७१ रुपये तर श्रीगोंदा (जि. अहमदनगर) येथील बंडू दत्तू लकडे यांच्या डाळिंबाला ४०, ७४, ९६, १२२, १४१ रुपये दर मिळाला.
आटपाडी येथील सौद्यांमध्ये कोणताही माल बाद म्हणून काढल जात नाही. शेतकऱ्यांचे कोणतेह नुकसान केले जात नाही. यामुळेच आटपाडीमध्ये सुरू असणाऱ्या डाळिंब सौदे बाजारात शेतकरी आपले फळ पीक घेऊन येतात. या सौद्यात शेतकऱ्यांन समाधानकारक दर मिळतो.
आटपाडी बाजार समिती सौदे बाजारात राज्यातील आणि देशातील फळ विक्रेते आणि व्यापारी हजेरी लावतात. बाजारात पारदर्शक कारभारामुळे दर्जेदार डाळिंबास तसेच प्रतवारीनुसार खराब डाळिंबालादेखील चांगला दर मिळतो. बाजार समितीच्या वतीने शेतकरी व व्यापाऱ्यांना चांगल्या सुविधा देण्यात आल्या आहेत. भविष्यात बाजार समितीमध्ये शेतकरी वर्गासाठी अन्य सोयी व सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. - संतोष पुजारी, सभापती