सांगली : हळदीला सोन्याचा भाव आल्याने यंदा जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणूनच बियाणाचा दर दुप्पट झाला आहे. मार्केट यार्डात बियाणे विक्रीसाठी आले असून, क्विंटलचा दर सहा हजार ५०० रुपयांवर पोहोचला आहे.
या हंगामात हळदीचे दर चांगलेच वधारले आहेत. सांगली मार्केटमध्ये गेल्यावर्षी राजापुरी हळदीला क्विंटलला सहा ते सात हजार असलेला दर १६ ते १८ हजारांपर्यंत पोहोचला आहे. चांगल्या दर्जाच्या हळदीला विक्रमी प्रती क्विंटल ७१ हजार इतका दर मिळाला आहे. मार्केट यार्डाच्या इतिहासातील हा सर्वाधिक दर आहे.
गत हंगामात कमी लागण झाल्याने हळदीचे उत्पादन घटले आहे. आवक घटल्यामुळे हळदीचे दर दुप्पट, तिप्पट झाले आहेत. हे दर टिकून राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. हळदीला सोन्याचा दर आल्याने येणाऱ्या हंगामात शेतकरी पुन्हा हळदीची जादा क्षेत्रावर लागण वाढविण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात १५ मेनंतर, तर कर्नाटक भागात एक जूननंतर नवीन हळदीची लागण केली जाते. मात्र, दर वाढल्याने यंदा एक महिनाभर अगोदरच लागण करण्यासाठी शेतकऱ्यांची गडबड सुरू झाली आहे. यामुळेच महिन्याभर अगोदर हळद बियाणे सांगली मार्केट यार्डात १०० टन सेलम येथून हळद बियाणे विक्रीसाठी आले आहे.
हळदीला सध्या सरासरी प्रती क्विंटल १६ हजार ते २७ हजारांपर्यंत दर मिळत आहे. यामुळे बियाण्यांच्या दरातही वाढ झाली आहे. गेल्यावर्षी हळदीच्या बियाणास प्रती क्विंटल सरासरी तीन हजार ५०० ते चार हजार दर होता. सहा हजार ५०० ते सात हजारांपर्यंत दराने विक्री होत आहे.
अधिक वाचा: पाडव्याला कोकणचा हापूसच राजा; ९१ हजार पेट्या आंब्याची आवक