रोजच्या आमटी, भाजीला स्वादीष्ट करणारी लसणाची फोडणी महागली आहे. ठाण्याच्या किरकोळ बाजारात लसूण चक्क ६०० रुपयांवर जाऊन पोहोचला. टोमॅटो आणि कोथिंबीर महागाईमुळे चर्चेत आले होते आता लसणाचे भाव गगनाला भिडल्याने सगळीकडे लसणाच्या दरांची चर्चा सुरू झाली. लसणाला पर्याय नसल्याने महाग असला तरी खरेदी करावा लागतो, अशी प्रतिक्रिया विक्रेत्यांबरोबर ग्राहकांनी दिली.
लसणाला आहारात महत्त्व आहे. मात्र, यंदा लसणाची आवक कमी झाल्याची माहिती लसणाचे व्यापारी संदीप चौधरी यांनी दिली. दि. २० जानेवारीपासून लसणाचा भाव वाढला. जुन्या लसणाची आवक जवळपास संपली आणि नवीन लसूण उपलब्ध नसल्याने सध्या बाजारात लसणाचे दर प्रचंड वाढलेले आहेत. यावर्षी लसणाचे उत्पादन कमी झाले. हवा तेवढा लसूण तयार झालेला नाही.
इथून होते आवकमध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश या ठिकाणांहून लसणीची आवक होते. महाराष्ट्रातून येणारा लसूण हा अगदी नगण्य असतो.
अधिक वाचा: तुरीचा बाजारभाव वाढला; मिळतोय उच्चांकी दर
लसणाचे प्रकारउटीचा लसूण, गावठी, जे टू, मळ्यापूर
दोन वर्षे लसणाला कमी भाव मिळाल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी लसणाची लागवड कमी केली. त्यामुळे लसणाचे क्षेत्रफळ कमी झाले, अशी माहिती चौधरी यांनी दिली. लसणाची लागवड साधारण सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत होते. जानेवारी ते मे या कालावधीत नवीन लसूण बाजारात येतो. मात्र बाजारात लसूण नसल्याने कमतरता जाणवत आहे. लसणाची आवक उत्तम होती तेव्हा १० ते १५ गाड्या दररोज बाजारात येत होत्या आता जेमतेम ४-५ गाड्या येत आहेत.
जुना लसूण नसल्याने चटणी तयार करण्याच्या कालावधीतच लसणाचे दर वाढल्याने चटणीत लसूण वापरायचा की नाही, या संभ्रमात ग्राहक आहेत. नवीन लसूण महिन्यानंतर बाजारात जसा येईल, तसे दर कमी होऊ लागतील असे व्यापाऱ्यांनी सांगितले.