रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे जिल्ह्यातील बागायतदारांना हापूस आंबा थेट विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी 'उत्पादक ते ग्राहक' थेट विक्री उपक्रम राबविण्यात येतो. दरवर्षीच या उपक्रमाला बागायतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. आंबा हंगाम २०२४ साठी आंबा उत्पादकांना आंबा विक्रीसाठी पुणे आणि राज्यातील/परराज्यांतील इतर शहरांमध्ये स्टॉल उपलब्ध होण्यासाठी आंबा उत्पादकांची नोंदणी दि. १५ फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे.
बागायतदारांना स्टॉल नोंदणीसाठी आंबा नोंदीसाठी खालील गोष्टी कराव्यात
- सातबारा उतारा (मागील सहा महिने कालावधीतील)
- आधारकार्ड; तसेच स्टॉलवर विक्री करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीचे आधारकार्ड प्रत.
- भौगोलिक मानांकन नोंदणी प्रमाणपत्र प्रत.
- महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या नावे दहा हजार रुपये अनामत रकमेचा धनादेश किंवा यापूर्वी अनामत रक्कम भरली असल्यास पावती प्रत.
- अर्ज, हमीपत्र ही सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत.
इच्छुक आंबा बागायतदारांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती 02352-299328 किंवा कृषी व्यवसाय तज्ज्ञ पवन बेर्डे यांच्याकडे संपर्क साधावा. आंबा हंगामाला दि. १५ मार्चनंतर सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.
अधिक वाचा: वेळीच करा आंबा मोहारावरील किडींपासून संरक्षण
बहुतांश बागायतदार आंबा वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीला पाठवितात. मात्र, प्रत्यक्ष आवक वाढली की दर गडगडतात. आंबा उत्पादनासाठी केलेला खर्चही निघत नाही. त्यावेळी बागायतदार थेट विक्रीचा प्रयत्न करतात. त्यासाठी पणन विभागातर्फे दरवर्षी शेतकऱ्यांसाठी पुणे, औरंगाबाद, नाशिक, तसेच महाराष्ट्रातील विविध शहरांतून आंबा महोत्सव आयोजित करून शेतकऱ्यांना थेट विक्रीची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
बाजारभावापेक्षा शेतकऱ्यांना दर चांगला मिळत असल्यामुळे फायदा होतो. त्यामुळे महोत्सव, प्रदर्शनासाठी बागायतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावर्षीच्या हंगामातही पुणे व अन्य शहरांतून आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.