Pulses Market :
विवेक चांदूरकर :
लहरी हवामानामुळे गेल्या दोन वर्षांपासून उडदाची पेरणी अत्यंत कमी होत आहे. त्यामुळे भावातही वाढ झाली आहे. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या तीन वर्षांत उडदाची आवक पाच पटीने घटली आहे. २०२१-२२ मध्ये ५६ हजार ४४७ क्विंटल आवक झाली होती, तर २०२३- २४ मध्ये केवळ ९ हजार ३६० क्विंटल आवक झाली आहे.उडीद व मुगाची पेरणी जून महिन्यामध्ये केल्यास उत्पादन चांगले येते. पेरणीला उशीर झाला तर या दोन्ही पिकांच्या उत्पादनात मोठी घट येते. गेल्या दोन वर्षांमध्ये पाऊस उशिरा झाला. त्यातच ऑगस्ट महिन्यामध्ये जेव्हा उडीद व मूग काढणीला येतो. त्यावेळी जोरदार पाऊस होतो. त्यामुळे या पिकांना फटका बसतो. त्यामुळे या दोन्ही पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. बुलढाणा जिल्ह्यात उडदाचे सरासरी क्षेत्र २२ हजार ६९७.३ हेक्टर असून, यावर्षी केवळ ३३ टक्के क्षेत्र ७ हजार ५८९.७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तसेच मुगाचे सरासरी क्षेत्र २० हजार ४०५.९ हेक्टर असून ७ हजार १२७.६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मुगाची पेरणी सरासरी क्षेत्राच्या केवळ ३४.९ टक्के झाली आहे. पेरणीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये पेरणी कमी झाल्याने आवकही घटली आहे. २०२१-२२ मध्ये खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ५६ हजार ४४७ क्विंटल उडदाची आवक झाली होती, तर २०२२- २३ मध्ये २५ हजार ७३३ क्विंटल आवक झाली. मागीलवर्षी २०२३- २४ मध्ये फक्त ९ हजार २६० क्विंटल आवक झाली. गेल्या तीन वर्षांत आवक पाच पटीने घटली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून भावात वाढ गेल्या तीन वर्षांपासून उडिदाच्या भावात वाढ होत आहे. वर्ष २०२१- २२ मध्ये २,२५० ते ७,५५० रूपये प्रतिक्विंटल दर होते. सरासरी दर ४ हजार ९०० रुपये होते. वर्ष २०२२-२३ मध्ये २,२०० ते ९ हजार रुपये दर होते. सरासरी दर ५ हजार ६०० रुपये होता. २०२३-२४ मध्ये ५ हजार ८३ ते ८ हजार २०० रुपये दर मिळाला. सरासरी दर ६ हजार ६५० रुपये आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये सरासरी दरात वाढ झाली आहे.
उडदाचे भाव ८ हजारांवर आवक कमी असल्यामुळे उडिदाचे भाव वाढत आहेत. १३ ऑगस्ट रोजी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उडिदाला ८ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. यावर्षी उडिदाला सरासरी ५ हजार ८३ ते ८ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. यावर्षी पेरणी केलेले उडीद २० ते २५ दिवसांनी बाजारात येणार आहे. त्यामुळे त्यावेळी भाव पडतात की कायम राहतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
उडदाची पेरणी कमी मूग व उडीद काढण्याची वेळ ऑगस्ट महिन्यामध्ये असते. त्यावेळी गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये जोरदार पाऊस झाला. परिणामी, पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी मूग व उडदाची पेरणी कमी प्रमाणात करतात. गतवर्षी पाऊस उशिरा आल्याने पेरणी कमी झाली.- मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा
गत तीन वर्षांतील आवक आवक (क्विं) सरासरी भाव (प्रति क्विं)२०२१-२२ ५६,४४७ ४,९००२०२२-२३ २५,७३३ ५,६००२०२३-२४ ९,३६० ६,६५०
मुगाची आवक घटली २०२१-२२ १८ हजार ५०४ क्विंटल२०२२-२३ ८६७० क्विंटल २०२३-२४ ३९८० क्विंटल