पुणे : दिवाळीत दरवर्षी भाऊबीजेच्या दिवशी मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला विभागाचे कामकाज बंद ठेवण्यात येते. मात्र, यंदा रविवारी (दि. ३ नोव्हेंबर) भाऊबीज आहे.
शनिवारी (दि. २ नोव्हेंबर) बाजार आवारास साप्ताहिक सुटी असते. सलग दोन दिवस मार्केट यार्डातील घाऊक बाजाराचे काम बंद राहिल्यास बाजारात भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल.
त्यामुळे यंदा भाऊबीजेच्या दिवशी फळे, भाजीपाला विभाग, तसेच पान बाजाराचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने सांगितले.
सलग दोन दिवस बाजार आवाराचे कामकाज बंद ठेवल्यास भाजीपाल्याची आवक होणार नाही. सणासुदीत नागरिकांना भाजीपाला उपलब्ध होणार नाही. त्यामुळे यंदा भाऊबीजेच्या दिवशी बाजार आवाराचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.
भाऊबीजेच्या दिवशी शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्री पाठवावा, असे आवाहन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर आणि सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी केले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होता कामा नये आणि ग्राहकांची देखील गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.