Pune Market Yard Close : कामगार संघटनांनी आणि व्यापाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बंद पुकारला असून पुणे बाजार समिती आज म्हणजे २६ फेब्रुवारी रोजी बंद असणार आहे. बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे विधेयक २०१८ आणि माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात कामगार संघटनांनी हा बंद पुकारला आहे. यामध्ये कामगार आणि अडत्यांच्या संघटना सामील होणार आहेत.
दरम्यान, छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोशिएशन, फूल बाजार अडते असोशिएशन हे या बंदमध्ये सहभागी असणार असून या बंदला पाठिंबा म्हणून पुण्यातील सर्व कामगार संघटना आणि अडते सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर विविध संघटनांनी यासंदर्भातील पत्र बाजार समितीली दिले आहे.
आज बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी. त्याचबरोबर आपला माल बाजारात घेऊन येऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे.
काय आहे बाजार समिती सुधारणा विधेयक?
कृषी उत्पन्न बाजार समिती सुधारणा विधेयक २०१८ च्या ६४ व्या विधेयकावर अध्यादेश निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा मिळण्याची शक्यता आहे. पुणे बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा मिळाल्यास एका वर्षापूर्वी निवडणुका पार पडून निवडून आलेले संचालक मंडळ बरखास्त होण्याची भिती आहे.