जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या भाताला शासनाकडून हमीभाव देण्यात येतो. दि मार्केटिंग फेडरेशनद्वारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात येते. यावर्षी भातासाठी प्रतिक्विंटल २,१८४ रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. मात्र, विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी ३१ डिसेंबर अंतिम मुदत दिली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून ३१ जानेवारीपर्यंत भात खरेदी केले जाणार आहे.
जिल्ह्यात १ लाखापेक्षा जास्त शेतकरी आहेत, तर ५९ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर भातपीक घेतले जाते. शेतकऱ्यांकडून भात खरेदी करताना शासन शेतकऱ्यांना २,१८४ रुपये क्विंटल भाव देत आहे. गतवर्षीच्या तुलनेत १४४ रुपये वाढून दिले आहेत. भात विक्री केंद्रांची संख्या ४४ एवढी आहे. प्रत्येक तालुक्यात केंद्र आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ४,२७० शेतकऱ्यांनी ३,३०० क्विंटल भात विक्री केली आहे. भात विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या अल्प प्रतिसादामुळे नोंदणी रखडली होती, शिवाय शेतकऱ्यांना भात विक्रीसाठी ३१ जानेवारीपर्यंत अंतिम मुदत आहे.
यावर्षी १४४ रुपयांची वाढ
- बाजारातील तांदळाचे दर प्रचंड वाढलेले आहेत. त्या तुलनेत शासन देत असलेला हमीभाव कमी आहे.
- गतवर्षी २,०४० रुपये दर मिळाला होता, यावर्षी २.१८४ रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रतिक्विंटल १४४ रुपयांची वाढ आली आहे. प्रतिक्विंटल १४४ रुपयांची वाढ अत्यल्प असून, दरात किमान ५०० रुपयांची वाढ अपेक्षित आहे.
३१ जानेवारीपर्यंत विक्री
- भात विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
- शेतकऱ्यांना ३१ जानेवारीपर्यंत भात विक्री करता येणार असून, ४४ केंद्रावर विक्री होणार आहे.
गतवर्षी चांगला प्रतिसाद
- गतवर्षी जिल्ह्यातील ३,९०० शेतकऱ्यांनी १ लाख क्विंटल भात विक्री केली होती.
- गतवर्षी भात विक्रीसाठी शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभला होता.
- या वर्षी आता विक्री सुरू झाली आहे.
चालू वर्षी उत्पन्नही समाधानकारक, यावर्षी पाऊस लांबल्याने खरेदी कमी झाली आहे. परंतु गतवर्षीपेक्षा यावर्षी खरेदी होण्याची शक्यता जास्त आहे. चालू वर्षी उत्पन्नही समाधानकारक होते. - अरुण नातू, जिल्हा सल्लागार, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम