उन्हाळा आला की आंबा बाजारात आला का, याची उत्सुकता खवय्यांना असते. मात्र, आरोग्यदायी जांभाळांचीही लोक वाट पाहत असतात. रायगड जिल्ह्यातही जांभळाचे पारंपरिक उत्पादन मोठे असून या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात गावोगावी जांभळे विक्रीसाठी येत असतात.
साधारण एप्रिलअखेर ही जांभळे बाजारात येत असतात. मात्र, यंदा काही दिवस अगोदरच जांभळं पिकली असून ती बाजारात आली आहेत. जांभाळांना मागणी वाढल्याने पहिल्या टप्प्यात चांगला भाव मिळत आहेत. सागरी आणि डोंगरी भागात ऑक्टोबर महिन्यात जांभळाची झाडे मोहोरण्यास सुरुवात झाली होती.
त्यामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात जांभूळ पक्व झाली आहेत. काही गावरान झाडांसह बहाडोली जातींच्या कलमी झाडांनाही फळे लगडलेली दिसत आहेत. इतक्या लवकर फळे तयार झाल्याचा हा प्रकार तुरळक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
एका टोपलीला ७५० ते ८०० रुपयांचा दर
- यंदाचा हा हंगाम नेहमीपेक्षा लवकर सुरु झाल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची आशा आहे. दुसरीकडे अपेक्षेपेक्षा लवकर जांभळांची चव चाखायला मिळणार असल्याने खवय्यांसाठीसुद्धा ही पर्वणी आहे.
- तसेच फळविक्रेत्यांनाही त्याचा आर्थिक लाभ होणार आहे. गत हंगामात दोन किलो बहाडोली जातींच्या जांभळाच्या एका टोपलीला ७५० ते ८०० रुपये दर मिळाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
भौगोलिक मानांकन मिळावे
विक्रीसाठी अधिकचा कालावधी मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या फळपिकाला यंदा निसर्गाने साथ दिली असून जांभळाला भौगोलिक मानांकन मिळाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्केटिंगसाठी फायदा होईल, असा विश्वास जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अधिक वाचा: भौगोलिक मानांकनाचा बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना होणार लाभ