कांदा अनुदान एकरकमी मिळवण्यासाठी बाजार समित्यांनीही राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. यासाठी राज्यातील संबंधित बाजारसमित्यांना पत्र देणार असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने स्पष्ट केले आहे.
दि. १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २३ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना साडेतीनशे रुपयांचे अनुदान राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. यापैकी अनेक शेतकऱ्यांना एक किंवा दोन हप्ता तर अनेक शेतकऱ्यांना एकही हप्ता कांदा अनुदान खात्यावर जमा झालेले नाही.
लासलगाव बाजार समितीमध्ये विक्री करण्यासाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना राहिलेले कांदा अनुदान तत्काल एकरकमी मिळावे यासाठी बाजार समिती पदाधिकारी, अधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मागणी करावी, यासाठी राज्य कांदा उत्पादक संघटनेने आग्रह धरला आहे. तसे लेखी पत्र महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांना दिले आहे.
दरम्यान राज्यातील राज्यातील संबंधित सर्व बाजार समित्यांनीही राज्य सरकारकडे शेतकऱ्यांचे राहिलेले कांदा अनुदान एकरकमी मिळण्यासाठी पाठपुरावा करावा म्हणून त्यांना पत्र दिले जाणार आहे, अशी माहिती कांदा संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली. मुंबई वाशी मार्केटमध्ये व परराज्यात विक्री केलेल्या शेतकऱ्यांनाही या कांदा अनुदान योजनेत समावेश करावा यासाठीही कांदा संघटनेकडून राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही ते म्हणाले.
दिनांक १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०१३ या कालावधीत ज्या ज्या शेतकऱ्यांकडे बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री केल्याची मुळ पावती आहे, परंतु कांदा अनुदान योजनेतून त्यांना वगळले आहे अशा सर्व शेतकऱ्यांनाही कांदा अनुदान द्यावे यासाठीही सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असेही श्री दिघोळे यांनी यावेळी सांगितले.