Join us

हळद विक्रीसाठी वाहनांच्या रांगा; मार्केट यार्डातच शेतकऱ्यांचा मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 8:58 AM

परजिल्ह्यातील हळद देखील बाजारात आल्याने आवक वाढली.

हिंगोली येथील मार्केट यार्डात हळदीची आवक वाढत असून, ३ एप्रिल रोजी तब्बल २५० वाहनांतून हळद विक्रीसाठी आली होती. या दिवशी जवळपास १०० वाहनांतील हळदीचे मोजमाप होऊ शकले तर उर्वरित १५० वाहनांतील हळदीचा काटा ४ एप्रिल रोजी करण्यात येत होता. या दिवशीही ५० वाहनांची भर पडली होती.

हिंगोली येथील बाजार समितीचा नवा मोंढा, संत नामदेव हळद मार्केट २२ मार्चपासून बंद ठेवण्यात आले होते. मार्च एंडचे कारण पुढे करीत आर्थिक व्यवहाराची जुळवाजुळव व्हावी, व्यवहार सुरळीत करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी बारा दिवस मोंढा, संत नामदेव मार्केट यार्डातील शेतमाल खरेदी-विक्री बंद ठेवण्यात आली होती. या काळात शेतकऱ्यांना मात्र खुल्या बाजारात पडत्या भावात शेतमाल विकण्याची वेळ आली होती. त्यानंतर ३ एप्रिलपासून मोंढा, मार्केट यार्डातील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत झाले.

जवळपास बारा दिवस मार्केट यार्ड बंद राहिल्याने सुरू होण्याच्या एक दिवस अगोदरपासूनच मार्केट यार्डात हळदीची आवक झाली. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जवळपास २५० वाहने हळद घेऊन दाखल झाली होती. यातील १०० वाहनांतील हळदीचे मोजमाप या दिवशी होऊ शकले, तर उर्वरित १५० वाहनांतील हळदीचा काटा ४ एप्रिल रोजी करणे सुरू होते. परंतु, या दिवशीही जवळपास ५० वाहने हळद घेऊन दाखल झाली होती.

समाधानकारक भावामुळे शेतकऱ्यांना दिलासा

बारा दिवसांच्या बंदनंतर मार्केट यार्ड सुरू झाल्याने आवक वाढली होती. आवक वाढल्यामुळे हळदीचे भाव घसरण्याची भीती शेतकऱ्यांना होती. मात्र, क्चिंटलमागे २०० ते ३०० रुपयांच्या फरकाने भाव स्थिर राहिले. सरासरी १४ ते १६ हजार रुपयांदरम्यान हळदीला भाव मिळत आहे. समाधानकारक भावामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.

भुसार मालाची आवकही वाढली

बाजार समितीच्या मोंढ्यात भुसार शेतमालाची आवकही वाढली आहे. सध्या शेतकरी गहू, हरभरा, ज्वारी, तूर, सोयाबीन विक्रीसाठी घेऊन येत आहेत. हरभरा, गहू, तुरीला बऱ्यापैकी भाव आहे. परंतु, सोयाबीनचे भाव मात्र कायम पडलेले आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

परजिल्ह्यातील हळद हिंगोलीच्या मार्केटमध्ये...

येथील संत नामदेव मार्केट यार्डात हिंगोली, परभणी, नांदेडसह विदर्भातील यवतमाळ, वाशिम, रिसोड भागातील शेतकरी हळद विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे आवक वाढत असून, एका दिवसात काटा होणे शक्य होत नाही. त्यामुळे शिल्लक हळदीचे मोजमाप दुसऱ्या दिवशी करण्यात येत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना मार्केट यार्डातच मुक्काम टाकण्याची वेळ येत आहे.

टॅग्स :पीकशेतकरीशेतीहिंगोली