एकूण कांद्याच्या उत्पादनापैकी एकट्या रब्बी हंगामात सुमारे ५० ते ६० टक्के उत्पादन होते. आणि त्यामुळे स्थानिक बाजारांमध्ये रब्बी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक एप्रिल, मे आणि जूनमध्ये होते. राहिलेला कांदा शेतकरी साठवणीमध्ये ठेवतात व हळूहळू डिसेंबरपर्यंत बाजारात आणतात.
अ) उन्हाळ्यात (एप्रिल-जून) किंमती कमी होणे
रब्बी कांद्याची मोठ्या प्रमाणात एप्रिल, मे आणि जून दरम्यान बाजारात आवक होते. परिणामी, उन्हाळ्यात (एप्रिल-जून) मागणीपेक्षा अधिक पुरवठा झाल्याने कांद्याच्या किंमती कमी होतात. या कालावधी मध्ये विशेषतः लहान आणि अल्पभूधारक शेतकरी ज्यांची धारण क्षमता कमी असते ते कांदा बाजारात विकण्यासाठी घेऊन येतात. त्यांच्या दैनंदिन खर्चाची पूर्तता करण्यासाठी उदा. बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादी खरेदीसाठी घेतलेले कर्ज; शैक्षणिक खर्च, विवाह खर्च; पुढील पिकासाठी निविष्ठांची खरेदी इ. साठी ते त्यांचे उत्पादन लगेच विकून टाकतात. शिवाय या शेतकऱ्यांकडे कांद्याच्या साठवणुकीसाठी कांदा चाळीचा अभाव असतोच. म्हणून, जबरदस्तीने ते काढणी नंतर लगेचच त्यांचे उत्पादन बाजारांमध्ये घेऊन येतात ज्यामुळे बाजारपेठांमध्ये मोठी आवक होते, शेवटी पुरवठा मागणीपेक्षा जास्त होतो आणि एप्रिल-मे-जून मध्ये किंमती खूप कमी होतात.
ब) ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान किमातींमद्धे चढ-उतार
रब्बी कांद्याचा मोठा भाग शेतकरी एप्रिल, मे आणि जूनमध्ये बाजारामध्ये आणतात व राहिलेला कांदा साठवणीमध्ये ठेवतात व हळूहळू डिसेंबरपर्यंत बाजारात घेऊन येतात. सामान्यतः मध्यम आणि मोठा शेतकऱ्याची धारण क्षमता जास्त असल्यामुळे ते कांदा साठवून ठेवतात व ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधी मध्ये बाजारात आणतात. साठवलेला रब्बी कांदा ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान बाजारात येतो व तो कांद्याच्या किंमतींवर वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम करतो.
कांद्याच्या किंमतींवर वेगवेगळ्या पद्धतीने होणारा परिणाम
१) रब्बी कांद्याची इष्टतम प्रमाणात साठवण
रब्बी कांद्याची इष्टतम प्रमाणात साठवण तसेच अर्ली-खरीप आणि खरीफ कांद्याचे सामान्य उत्पादन यामुळे मागणी आणि पुरवठा यामध्ये बॅलन्स राहतो व कांद्याच्या किंमती ऑगस्ट-डिसेंबर दरम्यान स्थिर राहतात. कांद्याचे भाव या काळात सामान्य राहतात.
२) रब्बी कांद्याची जास्त प्रमाणात साठवण
रब्बी कांद्याची जास्त प्रमाणात साठवण तसेच अर्ली-खरीप आणि खरीफ कांद्याचे सामान्य उत्पादन यामुळे ऑगस्ट-डिसेंबर दरम्यान मागणीपेक्षा पुरवठा जास्त होतो आणि कांद्याच्या किमती कमी होऊन जातात. जर रब्बी कांद्याचे उत्पादन जास्त असेल आणि निर्यात वातावरण प्रतिकूल असेल तर मध्यम आणि मोठा शेतकरी ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान मोठ्या किमतीच्या अपेक्षेने जास्त प्रमाणात कांदा साठवतो. या परिस्थितीत ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान मोठ्या प्रमाणात कांदा (साठवलेला रब्बी कांदा + अर्ली-खरीप आणि खरीप) बाजारात दाखल होतो. ही परिस्थिती बाजारपेठेत मागणीपेक्षा अधिक पुरवठा निर्माण करते आणि किंमती खाली जातात. ही घटना भारतीय बाजारपेठांमध्ये आढळते.
३) रब्बी कांद्याची कमी प्रमाणात साठवण
रब्बी कांद्याची कमी प्रमाणात साठवणूक तसेच अर्ली-खरीप आणि खरीफ कांद्याचे सामान्य उत्पादन यामुळे ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान मागणीपेक्षा पुरवठा कमी होतो आणि कांद्याच्या किमती खूप जास्त होऊन जातात. एप्रिल-मे दरम्यान कमी रब्बी उत्पादन, साठवण सुविधांचा अभाव आणि अनुकूल निर्यात वातावरणामुळे शेतकरी कमी प्रमाणात कांदा साठवतो. रब्बी कांद्याचे कमी उत्पादन विशेषतः कमी पाऊस, प्रतिकूल हवामान, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव, पाण्याची कमतरता या घटकांमुळे होत असते. भारतीय बाजारपेठांमध्ये ही अधिक सामान्य घटना आहे.