अरुण बारसकरसोलापूर : एखाद्या पिकांवर काही मिनिटांत व्हायरस यावा तसा पाऊस व गारपीट होण्याचा अभ्यासकांचा अंदाज सोशल मीडियावर वेगाने फिरला तशी द्राक्ष उत्पादकांच्या खिशाला कात्री लागली. जिल्ह्यात व परिसरात द्राक्षाचे दर अचानक ५ ते १० रुपयाने कमी झाले आहेत.
मागील तीन-चार वर्षे द्राक्ष बागायतदारांसाठी फारच नुकसानीची गेली. कधी केलेला खर्चही हाती न पडावा इतका दर कमी मिळाला तर कधी माल विक्री न झाल्याने बागेतून बाहेरही निघाला नाही. खर्च करून तरी काय उपयोग? अशी मानसिकताच शेतकऱ्यांची झाली होती.
द्राक्ष पीक आणण्यासाठी खते, औषधे व मजुरीवर खर्च तर करावाच लागतो. मात्र द्राक्षाला अपेक्षित दर मात्र मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी बागा काढून टाकल्या आहेत. आहे त्या बागांनाही स्थानिक बाजारात फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना परवडेल इतका दर मिळाला नाही.
मार्च महिन्यात सुपर सोनाका व माणीक चमण या वाणाला चांगला दर मिळू लागला होता. हाच दर या आठवड्यात प्रतिकिलोला ५ ते १० रुपयाने कमी झाला असल्याचे सांगण्यात आले.
विविध हवामान अभ्यासकांनी या आठवड्यात राज्यात गारपीट, वादळ व पावसाचा अंदाज व्यक्त केला होता हवामान बदलाचा मेसेज वेगाने सोशल मीडियावर सगळीकडे गेला तसा द्राक्ष खरेदी दरात घट झाल्याचे द्राक्ष बागायतदार संघांचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी सांगितले.
द्राक्ष क्षेत्र आणखी घटणारकोरोनानंतर द्राक्षाचा बाजार घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडला. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ५ हजार एकर द्राक्ष क्षेत्र कमी झाले आहे. यावर्षी पाण्याची कमतरता असल्याने बागा जगविणे कठीण होऊन बसले आहे. त्याचाही फटका बसणे अपेक्षित आहे. त्यामुळे पुढील वर्षी द्राक्षक्षेत्रात मोठी घट होईल, असे द्राक्ष बागायतदार संघांकडून सांगण्यात आले.
दर (प्रतिकिलो)■ सुपर सोनाका ५५ रुपयांपर्यंत गेलेला दर ५० रुपयांच्या आत आला.■ माणिक चमण ४५ पर्यंत गेलेला दर ४० रुपयांच्या खाली आला.■ एस.एस.एन., आर.के., अनुष्का या वाणाचा दर ६० रुपयांपर्यंत गेला होता, तो ५० रुपयांच्या आत आला.
हवामान खात्याने गारपीट व पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला, त्यातच द्राक्ष खाणे शरीराला अपायकारक असल्याची अफवा पसरवली. त्यामुळे द्राक्ष दरात वाढ होण्यास ऐवजी घट झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री बसली. - शिवाजी पवार, अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ, पुणे
अधिक वाचा: फळझाडे वाचविण्यासाठी पाणी कमी पडलंय; असा वापरा ठिबक संच