यंदा पर्यावरणाने साथ दिल्याने हवामान शुद्ध राहिले. परिणामी बेदाणा चांगल्या पद्धतीचा बाजारात विक्रीसाठी येत आहे. मंगळवारी झालेल्या बेदाणा बाजारात ४०० रुपये किलोप्रमाणे ६६० किलो बेदाणा विक्री झाली.
प्रति किलोला चारशे रुपये दर हा आजपर्यंतचा उच्चांकी दर असल्याचे बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ डोंबे यांनी सांगितले.
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाण्याचा बाजार मंगळवारी व शनिवारी मोठ्या प्रमाणात भरतो. या बेदाणा बाजारामध्ये सोलापूर, विजापूर, सांगली, सातारा, तासगाव, कर्नाटक, तुळजापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांतून व शहरातून बेदाणा पंढरपूरमध्ये विक्रीसाठी येतो.
प्रत्येक आठवड्याला अंदाजे १० टनांच्या २५० गाड्यांची आवक आहे. मार्च, एप्रिल, मे मध्ये अधिक मागणी असते. पंढरपुरातून तामिळनाडू-काश्मीर असा पंढरपूरचा बेदाणा प्रसिद्ध आहे. ५० रुपये किलोपासून ते ३५० रुपये किलो दराने विक्री झाला आहे.
परंतु, मंगळवारी, ५ मार्च रोजी भरलेल्या बेदाणा बाजारात बाजार समितीच्या निर्मितीपासून आज पहिल्यांदाच ४०० रुपये किलोप्रमाणे बेदाणे विक्री झाली आहे. पाटकुल (ता. मोहोळ) येथील नितीन वसंत गावडे यांनी ४४ बॉक्स बेदाणा विक्रीसाठी आणला होता. तो सांगली येथील व्यापारी प्रवीण सारडा यांनी ४०० रुपये प्रमाणे ६६० किलो बेदाणा खरेदी केला.
वर्षभरात बेदाण्याच्या २२ लाख बॉक्सची विक्रीपंढरपूर बेदाणा मार्केटमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत वर्षाला २२ लाख बेदाणाचे बॉक्स विक्री होतात. यातून अंदाजे साडेतीनशे कोटींच्या आसपास उलाढाल होत असल्याचे बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ डोंबे यांनी सांगितले.
उत्तम दर्जाचा बेदाणा आणणाऱ्या शेतकऱ्याचा सत्कारकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उत्तम दर्जाचा बेदाणा विक्रीसाठी आणलेले शेतकरी नितीन वसंत गावडे यांचा सत्कार माजी आमदार प्रशांतराव परिचारक, सोमनाथ डोंबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड, उपसभापती राजू गावडे, सचिव कुमार घोडके यांनी केला.