Join us

आजपासून रमजान; बाजारात आले विविध ४० प्रकारचे खजूर.. असा मिळतोय बाजारभाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 12:43 PM

यंदा बाजारात लाल खजूर, काळे खजूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खजुराच्या किमती स्थिर असून मागणी असली तरी दरांमध्ये वाढ झालेली नाही.

पुणे : मुस्लिम धर्मातील सर्वात पवित्र मानला जाणारा रमजान महिना मंगळवार (दि. १२) पासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत रमजानसाठी लागणारे विविध उपवासाचे पदार्थ, फळांची मोठी रेलचेल दिसून येत आहे.

यासाठी शहरातील विविध बाजारपेठा सजल्या आहेत. रमाजानचा उपवास सोडताना खजुराला अधिक महत्त्व असल्याने यंदा बाजारपेठेत खजुराचे ४० पेक्षा अधिक प्रकार दाखल झाले आहेत. इराण, इराक, सौदी. अफगाणिस्तान, दुबई, ओमान यांसह आखाती देशांमधून विविध प्रकारचे खजूर पुण्यातील बाजारपेठेत दाखल होत आहेत.

साधारण ९० रुपयांपासून ते २ हजार रुपयांपर्यंत याची किंमत आहे. पुण्यातील बाजारपेठेतून महाराष्ट्रातील विविध बाजारपेठांत अथवा किरकोळ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे पोहोचविले जातात.

यंदा बाजारात लाल खजूर, काळे खजूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खजुराच्या किमती स्थिर असून मागणी असली तरी दरांमध्ये वाढ झालेली नाही, अशी माहिती व्यापारी नवीन गोयल यांनी दिली.

खजुराच्या गुणवत्तेनुसार चढत्या दराने याच्या किमती असतात. यात ९० रुपयांपासून २ हजारांपर्यंत प्रतिकिलो किमतीच्या खजुराचा समावेश आहे. यासह बाजारात दूध, गोड दूध, शेवया, गोड भात, पुलाव, बिर्याणी, तळलेले पापड यासह केळी, सफरचंद, आंबे आदी फळे विक्रीसाठी व्यापारीवर्ग सज्ज झाला आहे. दुसरीकडे शहरातील विविध मशिदींना आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले आहे.

खजुराचे प्रकार किती?अजवा, मेदजोल, बुमेन, फर्द, किमिया, फरत, सुलतान, बुरारी, कलमी, मदिना, स्कसार, हसना, हार्मोनिअम, मुज्जरब, गुड, अल्जेरियन आदी प्रकारचे खजूर बाजारात उपलब्ध आहेत.

खजुरांना मागणी वाढली • रमजान महिन्यात रोजा सोडण्यासाठी खजुराचा उपयोग होतो. बाजारात १५ हून अधिक प्रकारचे खजूर विक्रीस उपलब्ध आहेत.• खजुरामधले मदिना नामक खजूर सर्वात महाग असून २,३०० ते २,६०० रुपये प्रतिकिलोप्रमाणे याची विक्री होत आहे.

टॅग्स :बाजारमार्केट यार्डपुणेमुंबई