कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आंबा, काजू, पेरू आदी फळपिके घेतली जात असली तरी एकूण क्षेत्राच्या खूपच कमी आहे. त्यातही काजू व आंब्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.
यंदा 'हापूस' आंब्याचे दर सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात होता. त्या तुलनेत 'रायवळ' आंब्याला मात्र चांगला दर भेटत असून, सध्या २०० रुपये डझनापर्यंत दर आहे.
'रायवळ'ची चवच न्यारी
तीन-चार महिने 'हापूस' आंबा जरी खाल्ला तरी 'रायवळ'ची चव चाखल्याशिवाय आंबा खाल्ल्यासारखा वाटत नाही. त्यामुळे 'रायवळ' प्रेमी वाट पाहत असतात.
२०० रुपयांपर्यंत दर
किरकोळ बाजारात 'रायवळ आंब्याचे दर १०० पासून २०० रुपये डझनापर्यंत आहेत. आंब्याच्या आकार व गोडीनुसार हे दर शेतकरी निश्चित करतात.
केमिकल विरहित आंब्यांमुळेच पसंती
शेतकरी रायवळ आंब्याची काढणी केल्यानंतर पिंजर, गवतामध्ये पिकवत घालतो. नैसर्गिक पद्धतीने पिकविल्यामुळे अधिक चवदार व रसाळ असतात. त्यामुळेच केमिकल विरहित 'रायवळ'ला ग्राहकांची अधिक पसंती असते.
कपिलतीर्थ, गंगावेश मार्केटमध्ये रेलचेल
ग्रामीण भागात सध्या 'रायवळ' आंब्याचा घमघमाट येत आहे. कोल्हापूर शहरातील कपिलतीर्थ माय, गंगावेश, सरस्वती टॉकीज परिसरात मोठ्या प्रमाणात हे आंबे विक्रीसाठी आलेले पाहावयास मिळतात.
हापूसचा हंगाम संपला असून सध्या 'रायवळ 'सह 'निलम', 'केसरी', 'दशेरी' आदी आंबा मोठ्या प्रमाणात दिसत आहे. आंब्याच्या आकार व वाणानुसार त्याचे दर आहेत. - प्रसाद वळंजू,व्यापारी, फळे
अधिक वाचा: Mango Varieties: आंबा लागवड करताय? कोणत्या जातीची निवड कराल