प्रशांत तेलवाडकर
छत्रपती संभाजीनगर : तिखट खाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. झणझणीत खाल्या शिवाय जेवणपूर्ण झाल्या सारखे वाटतच नाही. भाजीला झणझणीत पणा आणण्यासाठी लाल मिरचीचा वापर केला जातो. यंदा तिखट खवय्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे लाल मिरचीच्या किमंती मागील दोन महिन्यात आणखी कमी झाल्या आहेत.
तेजा ते रसगुल्लापर्यंत सर्व पर्याय
बाजारात आजघडीला सर्व प्रकारच्या लाल मिरची उपलब्ध झाल्या आहेत. गुंटूर (लवंगी) लाल मिरची, ब्याडगी मिरची, तेजा मिरची,चपाटा मिरची, काश्मीरी मिरची व रसगुल्ला मिरचीचा यात समावेश आहे. किराणा दुकानासमोर ओट्यावर वेगवेगळ्या मिरचीचे नमूने पोत्यात ठेवले आहेत.
लाल मिरचीचे फेब्रुवारी व एप्रिलमधील भाव
मिरची मार्च २०२४ एप्रिल
गुंटूर ३५०-४००रु २००-२४०रु
तेजा ३००-३५०रु २००-२७०रु
ब्याडगी ७००- ७५०रु ३२५-२५०रु
चपाटा ५००-५५०रु २७५-३०० रु
काश्मीरी ७००-७२५रु ५००- ५५०रु
ब्याडगी ९५०- १०००रु ४५०-५००रु
का घसरले मिरचीचे भाव
भारतीय लाल मिरचीला विदेशातून मोठी मागणी असते. यात चीन व बांगलादेश या दोन देशांचा समावेश होते. चीनकडून भारतीय मिरचीला मागणी कमी झाली आहे. तसेच बांगलादेश सध्या म्यांमार देशातून स्वस्त लाल मिरची खरेदी करीत आहे. याचा फटका देशातील मिरची उत्पादकांना बसला आहे. मागील दोन महिन्यात मिरचीचे भावात मोठी घट झाली आहे.-स्वप्नील मुगदिया,व्यापारी
वार्षिक मिरची खरेदी करणाऱ्यांना फायदा
अनेक जण वार्षिक धान्याप्रमाणेच वार्षिक लाल मिरची खरेदी करीत असतात. वर्षभराचा तिखट तयार करुन बरणीत भरुन ठेवत असतात. हंगामाच्या सुरुवातीला फेब्रुवारीत ज्यांनी लाल मिरची खरेदी केली ते यंदा तोट्यात राहिले कारण, फेब्रुवारीच्या तुलनेत सध्या लाल मिरचीचे भाव ४० ते ५० टक्कांनी कमी झाले आहेत. सध्याचा काळ लाल मिरची खरेदीसाठी योग्य असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.