उन्हाळ्यात लाल मिरची खरेदीचा हंगाम असतो. या काळात नवीन मिरचीबाजारात येते. भाव कमी असल्याने ही लाल मिरची खरेदी करून तिचे वर्षभर पुरेल एवढे तिखट करून ठेवले जाते. तिखट, झणझणीत खाणाऱ्यांसाठी लाल मिरचीचे दर कमी झाल्याने मिरचीचा ठसका उतरला आहे.
गेल्यावर्षी सुक्या मसाल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाल मिरचीचे दर घाऊक बाजारातच ३५० ते ४०० रुपये किलो झाले होते; मात्र यंदा किलोमागे आता हे दर १०० ते १५० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात लाल मिरचीचा ठसका उतरणीला लागला आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भाव कमी असल्याने वार्षिक मिरची खरेदीसाठी ग्राहक बाजारात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. लाल मिरची प्रामुख्याने विविध भागातून मंडईत पोहोचते; मात्र सर्वाधिक आवक कर्नाटकातील विजापूर, इंडी, गुलबर्गा येथून होते.
सध्या नव्याने हंगाम सुरू झाला असून, आवक अशीच वाढत राहिली, तर दर अजून काही प्रमाणात नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. मिरचीचे दर नियंत्रणात येत आहेत. मार्च व एप्रिल अखेरपर्यंत मिरचीची मागणी वाढणार असून, यंदा भाव नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे.
लाल मिरचीचे भाव कमी झाले
तेजा (कर्नाटक) : १८० ते २००
ब्याडगी : २०० ते २५०
गुंटूर (आंध्र प्रदेश) : २५० ते २८०
सिफाई : ११० ते १५०
कशामुळे लाल मिरची स्वस्त?
गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे मिरचीच्या पिकाला मोठा फटका बसला होता. त्यातच अनेक ठिकाणी गोदामात असलेली लाल मिरचीही पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले होते. सर्वाधिक लाल मिरची उत्पादक राज्य म्हणजे आंध्र प्रदेश होय. या राज्यात मिरचीचे उत्पादन यंदा मुबलक प्रमाणात झाले आहे. यामुळे नवीन लाल मिरचीची आवक वाढली व भाव कमी झाले असल्याचे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी सांगितले.