बारामतीःबारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे रेशीम कोष मार्केट मध्ये कोषास रु. ७२५/- प्रति किलो उच्चांकी दर मिळाला.
बारामती बाजार समितीचे रेशीम मार्केट हे ऑनलाइन मार्केट असल्याने महाराष्ट्र राज्यातील तसेच कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यातील खरेदीदार यामध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे कोषास चांगला दर मिळत आहे.
रेशीम कोषास वाढत असलेल्या दरामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात तुती लागवडीकडे वळत आहे. बारामतीमध्ये पारदर्शक व्यवहार, कोषाचे इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर अचूक वजन, ऑनलाइन पेमेंट, कुठलीही कडती नाही.
यामुळे रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कोष बारामती रेशीम कोष मार्केटमध्येच विक्रीस आणावा, असे आवाहन बारामती बाजार समितीचे सभापती सुनील पवार, उपसभापती नीलेश लडकत यांनी केले आहे.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने समितीमार्फत कोष खरेदीसाठी व्यापाऱ्यांना तसेच रिलर्स यांना लायसेन्स दिले असल्याने लायसन्सधारक खरेदीदार ऑनलाइन कोष खरेदी करीत आहेत. रेशीम मार्केटमध्ये आज एकूण ५४० किलो कोषाची आवक होऊन किमान रु. ५९० तर सरासरी रु. ६९०/- असा दर मिळाला आहे.
काळुराम हरिभाऊ घाडगे आणि प्रमोद दादाभाऊ घाडगे (रा. दावडी, ता. खेड जि. पुणे) या रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांच्या कोषास जादा दर मिळाला आहे. सन २०२२ पासून रेशीम मार्केट सुरू झालेपासून आत्तापर्यंत ७ कोटी रुपयांची उलाढाल झाली असून एकूण १६० टन कोष विक्री झाली आहे.
बारामतीसह पुणे, सोलापूर, अमहदनगर, सातारा या जिल्ह्यातून शेतकरी कोष घेऊन येत असून जादा दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी असल्याची माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
अधिक वाचा: E Pik Pahani : ई-पीक पाहणी करताना पिकाचा असा फोटो काढणे बंधनकारक; वाचा सविस्तर