बारामती : बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे रेशीम कोष मार्केटमध्ये कोषास प्रति किलोस रु. ७७०/- असा उच्चांकी दर मिळाला. ३० जानेवारी रोजी ४४५ किलो आवक होऊन किमान ४५० आणि सरासरी ७२० रुपये प्रति किलो दर निघाले.
चंद्रकांत दत्तु गुळुमकर (रा. साबळेवाडी, ता. बारामती) यांचे कोषास प्रति किलोस ७७० रुपये इतका उचांकी दर मिळाला. तर एकूण रु. १ लाख ७८ हजार रक्कम मिळाली.
रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कोष विक्रीस आणताना ग्रेडिंग व स्वच्छ करून आणावा, म्हणजे कोषास जादा दर मिळेल. तसेच शेतकऱ्यांनी परस्पर बाहेरील व्याऱ्यांना कोष विक्री करू नये.
आपला कोष रेशीम कोष मार्केटमध्येच विक्री करावा. बारामती रेशीम कोष मार्केटमध्ये ई-नाम प्रणाली सुरू असल्याने चांगली विक्री व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामुळे इतर व बाहेरील राज्यातील मार्केटप्रमाणे दर मिळत आहेत.
बारामती बाजार समितीतर्फे शेतकरी व रिलर्स यांना संबंधित आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे आवाहन बाजार समितीचे सभापती विश्वास आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी केले.
शासनामार्फत बारामती मुख्य यार्डामध्ये रेशीम कोष मार्केट व कोषोत्तर प्रक्रिया, प्रशिक्षण केंद्र इमारतीचे बांधकाम सुरू असून त्याठिकाणी शेतकरी व व्यापाऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.
भविष्यात रेशीम कोष उत्पादक व रिलर्सकरिता एक भव्य मार्केट होणार आहे, अशी माहिती रेशीम संचालनालय, नागपूरचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे यांनी दिली.
यावेळी प्रादेशिक रेशीम कार्यालय सहाय्यक संचालक डॉ. कविता देशपांडे, संजय फुले, सूर्यकांत मोरे, सोमनाथ जगताप उपस्थित होते.
दोन महिन्यात २६ टन कोषांची विक्री१) बारामती मार्केट कमिटीमध्ये रेशीम कोष खरेदी विक्री ई-नाम प्रणालीद्वारे सुरू असून डिंसेबर २०२४ व जानेवारी २०२५ या दोनच महिन्यात ३०७ शेतकऱ्यांच्या २६ टन कोषाची विक्री झाली असून दीड कोटीची उलाढाल झाली.२) कोषास ५९० रुपयांपासून ७७० रुपये प्रति किलोस दर मिळाला आहे.३) बारामती रेशीम मार्केटमध्ये ऑनलाईन लिलाव व पारदर्शक व्यवहार, अचूक वजन यामुळे शेतकरी कोष घेऊन येत आहेत, अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
अधिक वाचा: Satbara Utara : ५० वर्षानंतर सातबारा उताऱ्यात झाले हे मोठे बदल; वाचा सविस्तर