Join us

Rice Market : काली मुँछ, कोलम, इंद्रायणी तांदळाला मागणी; किती मिळतोय भाव वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 3:56 PM

काली मुँछ, कोलम, इंद्रायणी, चाँद तारा, बासमती, सुगंधी चिन्नोर, आदी तांदळांना मोठी मागणी असते. (Rice Market)

Rice Market :

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदीचा उत्साह असतो. मात्र, यंदा खाद्यतेलासह किराणा साहित्याचे दर वधारले आहेत. त्यामुळे नागरिकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. दररोजच्या आहारात भाताचा समावेश असतो.काली मुँछ, कोलम, इंद्रायणी, चाँद तारा, बासमती, सुगंधी चिन्नोर, आदी तांदळांना मोठी मागणी असते. मात्र, या तांदळांच्या दरातही १० ते २० रुपयांची वाढ झाली आहे.अनेकांना जेवण करताना भात हवा असतो. जेवणात भात नसेल तर त्यांना जेवण नकोसे वाटते. त्यामुळे वरण-भात आता भारतीयांच्या जेवणात अनिवार्य झाला, यंदा तांदळाचे उत्पादन कमी असल्याने ग्राहकांना तांदूळ खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. दिवाळीनंतर ६० रुपये किलोने विक्री होणारा कोलम तांदूळ आता बाजारात ७०-८० रुपये किलोने विक्री होत आहे. मागील वर्षी तांदूळ उत्पादक राज्यात कमी पावसामुळे तांदळाचे उत्पादन कमी राहिले.त्यामुळे मागील सहा महिन्यांत कोलम तांदळाचा भाव क्विंटलमागे ५०० रुपयांनी तर इतर जातीच्या तांदळाचे दरही किलोमागे १५ ते २० रुपयांनी वाढले होते. कालीमूँछ तांदूळ क्विंटलमागे १ हजार ५००, बासमती २ हजार तर इंद्रायणीचा भाव क्विंटलमागे १ हजार ५०० रुपयांनी वाढले होते.परंतु, मागील तीन महिन्यांपासून बाजारात तांदळाचे भाव स्थिर आहेत. सध्या बाजरात कालीमूँछ ७५ ते ८० रुपये किलो आहे. येत्या महिन्यात येणारे नवीन उत्पादन चांगले असल्याने भाव कमी होतील, अशी आशा पल्लवित झाली आहे. बासमती तांदळाच्या दरात क्विंटलमागे पाच रुपये किलोची घसरण झाली आहे.

आणखी ६-८ महिने हे भाव कायम राहणार

सध्या जालना बाजारपेठेत सर्व प्रकारचे तांदूळ आले आहेत. बासमतीची निर्यात कमी केल्याने त्याचे भाव टिकून आहेत. यंदा महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशात तांदळाचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे तांदळाचे हे भाव कमी होणार नाहीत. आणखी सहा ते आठ महिने हे भाव कायम राहणार आहेत.

४०० रुपयांची भाववाढ क्विंटलमागे

यंदा आपल्या देशात तांदळाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे तांदळाच्या किमतीत एका क्विंटलमागे ४०० रुपयांची भाववाढ झाल्याचे दिसत आहे.

रेशनच्या तांदळाला मागणी

यंदा तांदळाच्या किमती वाढल्याचे व्यापारी अभिजित गोदा यांनी सांगितले. त्यामुळे अनेकजण आता रेशनचा तांदूळ खाण्यास पसंती देत आहेत. हा तांदूळ खेड्यातील लोक आवडीने खातात. परंतु, शहरी लोक दुर्लक्ष करतात.

तांदूळ व्यापारी काय म्हणतात....

तांदळापासून बासमती तांदळापर्यंत जवळपास ६० प्रकारचे तांदूळ आहेत. हे सर्व तांदूळ बाजारात विक्रीला आहेत.- अभिजित गोदा, व्यापारी, जालना

सध्या जालना बाजारपेठेत सर्व प्रकारचे तांदूळ आले आहेत. बासमतीची निर्यात कमी केल्याने त्याचे भाव टिकून आहेत. कोलमला सर्वाधिक मागणी आहे. - संजय लव्हाडे, व्यापारी, जालना

बाजारात सध्या तांदळाचे भाव स्थिर आहेत. येत्या पंधरा दिवसांत नवी कोलम, बीपीटी, एचएमटी तांदूळ बाजारात येईल, नवा बासमती नोव्हेंबरमध्ये तर डिसेंबरमध्ये कालीमूछ तर इंद्रायणी, आंबेमोहर नवा तांदूळ बाजारात येईल. यावर्षी पीक चांगले असल्याने दरही काही प्रमाणात कमी होण्याचा अंदाज आहे. - केदारनाथ झंवर, तांदळाचे व्यापारी, बीड.

ऑक्टोबरअखेरपासून नवीन तांदळाची आवक सुरू होणार आहे. त्यामुळे कोलम, कालीमूंछ व इतर तांदळाचे दर कमी असतील; परंतु काही महिन्यानंतर उत्पादन, साठा व मागणीप्रमाणे तेजी येऊ शकते. - गंगाबिशन करवा, किराणा व्यापारी, बीड.

दिवाळीच्या सणासाठी बाजारात खरेदीचा उत्साह असतो. इतर राज्यांतून लातूरात होणारी तांदळाची आवक काही प्रमाणात कमी आहे. त्यामुळे दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. आवक वाढल्यास दर कमी होतील. कोलम, काली मुँछ आणि इंद्रायणी, बासमती या तांदळांना ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी आहे. दिवाळी संपेपर्यंत दर स्थिर राहतील अशी शक्यता आहे.- आकाश जाधव, किराणा व्यापारी, लातूर

किलोमागे पाच ते दहा रुपयांची झाली आहे वाढ...मागील काही दिवसांत तांदळाची आवक कमी आहे. त्यामुळे किलोमागे पाच ते दहा रुपयांची वाढ आहे. दिवाळीच्या सणामुळे दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे.

बीडकरांना आवडतो कोलम

रोजच्या आहारात खायला चवदार, मुलायम असल्याने बीडकरांना कोलम तांदूळ आवडतो. कोलम तांदळाला जास्त मागणी असते. वेगळ्या स्वादाची ओळख असलेल्या कालीमूंछ आणि बीपीटीलाही ग्राहक पसंती देतात.

लातूरकरांना आवडतो काली मुँछ आणि अब्बा हुजूर

लातूर शहरासह ग्रामीण भागात कोलम तांदळाला सर्वाधिक मागणी आहे. त्यापाठोपाठ काली मुँछ आणि अब्बा हुजूर, बासमती तांदळाची खरेदी ग्राहकांकडून होते. कोलम तांदूळ ६० ते ७० रुपये किलो दराने मिळतो.

तांदळाचे भाव किती? (प्रति किलो)

प्रकार                        भाव
कालीमूँछ    ७५ ते ८०
कोलम ६५ ते ७
सध्या बासमती तांदळाचा भाव   ११५ ते १२०
इंद्रायणी            ६५ ते ७०
आंबेमोहर          ७५
कंपन्यांचे प्रीमियम बँडचे दर१४० ते १५०
बीपीटी५०
एचएमटी५५
टॅग्स :शेती क्षेत्रबाजारशेतकरी