Join us

नवीन तांदूळ येण्याआधीच भाताची चव 'बिघडली'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 2:00 PM

तांदळाची होतेय तेलंगणावरून आयात...

नवीन तांदळाची चाहूल लागते, तेव्हा जुन्या तांदळाचे भाव कमी होत असतात, पण यंदा चक्र उलटे फिरले आहे. तांदळाचा नवीन हंगाम सुरू होतानाच, दुसरीकडे जुन्या तांदळाचे भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी जुन्या तांदळाच्या भाताची चव बिघडली आहे.

तेलंगणातून येणाऱ्या कोलम तांदळाचे भाव क्विंटलमागे २ हजार ते अडीच हजार रुपयांनी वाढले आहेत. सध्या ६० ते ६४ रुपये किलो दर आहे, तसेच बासमतीच्या तांदळातही मोठी वाढ झाली आहे. बासमती क्विंटलमागे ७०० रुपयांनी वधारून ९० ते १४० रुपयांदरम्यान विकला जात आहे.

तेलंगणातून थोडीशी आवक सुरू

तेलंगणातून नवीन कोलम तांदळाची थोडीशी आवक सुरू झाली आहे. विदर्भात तांदळाचे उत्पादन समाधानकारक आहे.

का वाढले भाव?

यंदा सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने महिनाभर उशिराने पेरणी झाली. यामुळे नवीन तांदळाचा हंगाम महिनाभर उशिराने होत आहे. यात कर्नाटक राज्यात तांदळाचे उत्पादन कमी असल्याचे सांगितले जात आहे.

कधी येणार नवीन तांदूळ?

डिसेंबर महिन्याच्या १५ तारखेनंतर नवीन तांदळाची आवक वाढेल. जानेवारीत सर्व प्रकारचा नवीन तांदूळ उपलब्ध होईल.

बासमती खाण्यासाठी ठेवा खिसा गरम

दरवर्षी देशात सरासरी १०० लाख टनांपेक्षा अधिक बासमती तांदळाचे उत्पादन होत असते. मात्र, यंदा जुलैनंतर पावसाला सुरुवात झाली. यामुळे उत्पादन ८ ते १० लाखांनी घटण्याची शक्यता तांदळाचे कमिशन एजंट व्यक्त करीत आहेत. परिणामी, बासमतीचे भाव वाढतील व नवीन बासमती तांदूळ खरेदीसाठी खवैय्यांना खिसा गरम ठेवावा लागणार आहे. -टिंकू खटोड

नवीन तांदळाचे भाव काय असतील?

तांदळाचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत कमी असल्याने, नवीन तांदळाचे भाव वधारलेले असतील. डिसेंबर महिन्यात नवीन तांदळाच्या भावातील तेजी-मंदी लक्षात येईल.

टॅग्स :भातशेतकरी