Join us

सरकी ढेप, तूर तेजीत तर खाद्यतेलासह सोन्या-चांदीत मंदी; वाचा बाजार आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 09:48 IST

Agriculture Market Update : दिवसेंदिवस वाढते ऊन आणि शेती उत्पादनातील घट पाहता बाजारपेठेत ग्राहकांची आवक अत्यंत कमी असल्याने बाजारपेठेत मंदीचे सावट आहे.

संजय लव्हाडे

दिवसेंदिवस वाढते ऊन आणि शेती उत्पादनातील घट पाहता बाजारपेठेत ग्राहकांची आवक अत्यंत कमी असल्याने बाजारपेठेत मंदीचे सावट आहे.

सोमवारपासून नाफेडच्या माध्यमातून शासकीय तूर खरेदी सुरू होणार आहे. सरकी ढेप, काबुली हरभरा, हरभरा, तूर यांच्या भावांमध्ये सध्या थोडीशी तेजी आली आहे.  

तर दुसरीकडे खाद्यतेल व सोन्या-चांदीत मात्र मंदी दिसून येत आहे. तसेच जालना जिल्ह्यातील विविध तूर खरेदीस अल्प प्रतिसाद मिळत आहे.

साखरेचे उत्पादन कमी राहणार

या वर्षाचा गळीत हंगाम देखील मार्च अखेरपर्यंत संपणार असल्याने येत्या काळात साखरेमध्ये आणखी तेजी येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे वाढत्या उन्हामध्ये अनेक शीतपेय बनविण्यासाठी साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो त्यामुळे साखरेची मागणी वाढली आहे. साखरेचे भाव ४१५० ते ४२५० रुपये प्रति क्विंटल आहेत.

काबुली हरभऱ्याची आवक वाढली

या वर्षी काबुली हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज जवळपास २०० पोत्यांची आवक असून, भाव ५८०० ते ८३५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत आहेत. त्याचबरोबर गावरान हरभऱ्याची आवक चांगली असून, भाव ५३०० ते ५५५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव आहेत.

तूर विक्री नोंदणीस अल्प प्रतिसाद

तूर विक्रीस शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत केवळ ८२ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. सोमवारी नोंदणीची मुदत संपणार आहे.

सोन्या-चांदीमध्ये मंदी कायम

• मागील काही महिन्यांपासून सोने चांदीच्या दरात प्रचंड वाढ होताना पाहायला मिळत होते. सोने-चांदी खरेदीची किंमत लाखोंचा अंक गाठतेय की काय? अशी अनेकांना भीती वाटत होती.

• मात्र, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर प्रति तोळा ८८ हजार रुपये, तर चांदी प्रति किलो १ लाख रुपये आहेत.

सरकी ढेपेमध्ये पुन्हा तेजी

मागील काही दिवसांमध्ये सरकी ढेपेमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी पहावयास मिळाली आहे. त्यातच गत आठवड्यात यामध्ये आणखी भर पडल्याने येत्या काळात सरकी ढेपचे दर आणखी वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. सरकी ढेपचे भाव ३३०० ते ३४०० रुपये प्रति क्विंटल आहेत.

हेही वाचा : विविध आजारांवर वरदान ठरणारी 'सुपर फूड' ज्वारी खायलाच हवी

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डशेतकरीपीकजालनामराठवाडातूर