APMC Risod remain closed ऐन पेरणीच्या काळातच रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांना (एपीएमसी) नाणेटंचाई जाणवत असल्याने २२ जूनपर्यंत बाजार समितींचे व्यवहार बंद ठेवण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या पेरणीसाठी खासगी बाजार समितीत नाइलाजाने शेतमाल विकावा लागत आहे.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला हक्काची बाजारपेठ मिळावी, हमीभावानुसार भाव मिळावा, वजनकाटा व शेतमालाच्या चुकाऱ्याबाबत विश्वासार्हता यावी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली. सध्या खरीप हंगामातील पेरणीचे दिवस सुरू झाल्यामुळे खत, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी पैशांची जुळवाजुळव करीत आहेत. पेरणीसाठी राखून ठेवलेला विक्रीसाठी काढला आहे. अशातच १३ जूनपासून रिसोड कृषी उत्तन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. अनेकांना खासगी बाजारात शेतमाल विकावा लागला. तेथे कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने खासगी व्यापाऱ्यांकडून शेतमालाची कमी भावात खरेदी केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांना कमी भावात खासगी व्यापाऱ्यांना शेतमाल विक्रीशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे शेतमाल विक्री करताना शेतकऱ्यांना गैरसोय व आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. ऐन पेरणीच्या हंगामातच बाजार समिती बंद असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
पेरणीच्या दिवसांतच बाजार समिती बंद
व्यापाऱ्यांनी नाणेटंचाईचे कारण समोर करून रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार १३ ते २२ जून या कालावधीत बंद ठेवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना २२ जूनपर्यंत मिळेल त्या भावात खासगी व्यापाऱ्यांना शेतमाल विकावा लागणार आहे. नैसर्गिक आपत्ती येवो की मानवी, यामध्ये शेतकरीवर्गच भरडला जात असल्याने शेतकऱ्यांचा वाली कोणी आहे की नाही? अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत. पेरणीच्या दिवसांतच बाजार समिती बंद केल्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे.
रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार २२ जूनपर्यंत बंद राहणार असल्याचे कळले. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीसाठी राखून ठेवलेला शेतमाल विक्रीसाठी बाहेर काढला आहे. मात्र, बाजार समितीच बंद असल्यामुळे तो कुठे विकावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पेरणीच्या हंगामात बाजार समिती बंद ठेवल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. -
विजय जटाळे शेतकरी वाकद
शेतमाल खरेदी करणाऱ्या खरेदाराकडे अडत्यांची रक्कम मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. नाणेटंचाईमुळे १५ जूनपर्यंत बाजार समिती बंद ठेवण्याचे सांगितले होते. तथापि, पालखीच्या आगमनामुळे २२ जूनपर्यंत बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
- ए.पी. कानडे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड