विशाल विकारी लोणावळा : गुलाब फूल उत्पादनाचे माहेरघर, अशी ओळख असलेल्या मावळ तालुक्यात 'व्हॅलेंटाईन डे'ची जय्यत तयारी सुरू आहे. यावर्षी गुलाब फुलांचे जादा उत्पादन, मात्र मागणीत घट झाल्याने देशातील व परदेशातील बाजारपेठांमध्ये फुलांचे भाव पडले आहेत. याचा फटका मावळातील फुल उत्पादकांना बसला आहे.
मावळ तालुक्यामधून यंदा साधारणतः २५ ते ३० लाख गुलाब फुले परदेशी बाजारात निर्यात केली जाणार आहेत. साधारण ६० ते ७० लाख फुले स्थानिक, देशातील बाजारपेठेमध्ये जाणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. भारतामधून गुलाब फुले परदेशात निर्यात केली जातात. मात्र, निर्यात धोरणामध्ये सुधारणा होत नसल्याने तसेच शीतगृह व शिपमेंटच्या अडचणी, वाहतुकीवर लावण्यात आलेला जीएसटी यामुळे भारतामधून गुलाब फुलांची निर्यात घटू लागली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे सर्वच ठिकाणी गुलाबाचे दर कमी आहेत
कृत्रिम फुलांचा वापर वाढल्याचा शेतकऱ्यांना बसतोय फटका• मावळ तालुक्यात २५० ते ३०० हेक्टरवर गुलाब फुलांचे उत्पादन घेतले जाते. 'व्हॅलेंटाईन डे' हा विक्रीचा मुख्य कालावधी असला तरी वर्षभर उत्पादन घेतले जाते. यावर्षी थंडी कमी असल्याने उत्पाटन वाढीसाठी खते औषधांचा वापर करावा लागला.• नोव्हेंबर व डिसेंबरमधील लग्नसराई यावर्षी कमी झाल्याने स्थानिक बाजारात फुलांची विक्री कमी झाली. त्यातच लग्नसराई व इतर कार्यक्रमांमध्ये कृत्रिम फुलांचा वापर वाढू लागला, कृत्रिम फुलांच्या आयातीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी पवना फूल उत्पादक संघाचे संस्थापक मुकुंद ठाकर यांनी केली आहे.
अधिक वाचा: दोन ते अडीच महिन्यात उत्पादन देणाऱ्या ग्लॅडिओलसची शेती कशी कराल?
शीतगृहांचा अभाव• १ ते ९ फेब्रुवारीदरम्यान मावळ तालुक्यातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत. तर १० तारखेपासून भारतीय बाजारपेठेत फुले पाठवली जाणार आहेत.• मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादित होणारी फुले साठवून ठेवण्यासाठी शीतगृहांची व्यवस्था नसल्याने दलालांचे फावते.• ते शेतकऱ्यांकडून कमी भावाने फुले घेऊन त्याची साठवणूक करत मागणी वाढल्यानंतर ज्यादा दाराने त्याची विक्री करतात.
अशी झाली दरातील घसरण• भारताच्या तुलनेत केनिया व इथोओपिया या देशांमधून कमी दराने निर्यात होत असल्याने नेदरलँडच्या जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय फुलाच्या मागणीत घट झाली आहे.• यामुळे भारतामध्ये विशेषतः मावळ तालुका व कर्नाटक-तामिळनाडूच्या सीमेवरील होसूरमधून उत्पादित होणारी फुले स्थानिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात जात आहेत.• परिणामी, स्थानिक बाजारातील फुलांचे भाव गडगडले. यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १४ ते १५ रुपये दर मिळाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चार ते पाच रुपयांची घसरण झाली. • स्थानिक बाजारपेठेत चावधी सतत बदल होत असून, सरासरी ९ ते १० रुपये दर मिळाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत किमान आठ ते दहा रुपयांनी दर घसरले आहेत.