जालना जिल्ह्यातील अंबड शहरासह परिसरात गावरान तसेच इतर जातीच्या कैऱ्या विक्रीसाठी शेतकरी, व्यापारी घेऊन येत आहेत. मात्र, २०० ते ३०० रुपये शेकडा मिळणारी कैरी बाजारपेठेत ४० ते ६० रुपये किलो याप्रमाणे दुपटीच्या भावात विकली जात आहे. लोणच्यासाठी लागणाऱ्या कैरीची भाववाढ होऊनदेखील वर्षभर जेवणाची लज्जत वाढवणारे लोणचे बनवावेच लागते. भाववाढ होऊनही कैऱ्याची विक्री होत असल्याचे बाजारपेठेमध्ये दिसून येत आहेत.
मीठ, हळद लावून आवडीने कैरी खाणारेही पुष्कळ आहेत. कैऱ्या खाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने मागणी वाढल्यामुळे शहरी भागातील बाजारपेठेसह ग्रामीण भागातील आठवडी बाजारात गावरान आंबे उपलब्ध नसल्याने व्यापारी इतर राज्यातून कैऱ्या विक्रीसाठी मागवून घेतात.
अक्षयतृतीयापासून ते जून महिन्यापर्यंतच कैऱ्यांपासून खार (लोणचे) बनवण्याचा मुख्य हंगाम असतो. त्यामुळे या काळात शहरात मोठ्या प्रमाणात कैऱ्या विक्रीस येतात. अगदी आठवड्याला ५ ते ६ टन कैरी शहरात विक्रीसाठी लागतात. कैऱ्यांची हातोहात विक्रीदेखील होते. परिसरात तसेच तालुक्यात शहरातूनच कैऱ्याचा पुरवठा केला जात आहे. परिसरातील ग्रामस्थ लोणच्यासाठी खासकरून गावरान तसेच मकराम जातीच्या आंब्याच्या कैऱ्या नेतात.
आकाराने मोठ्या व मध्यम असणाऱ्या या कैऱ्यांना कडक भाग कमी आणि मांसल भाग अधिकचा असतो, शिवाय त्याला चांगली आंबट चवही असते. त्यामुळे लोणचे घालण्यासाठी या कैऱ्यांचा सर्वाधिक वापर होतो. अगदी घरगुती वापरापासून ते विक्रीसाठीदेखील या कैऱ्यांचा वापर होतो.
प्रत्येक घराघरातील जेवणाची लज्जत कैरीचे लोणचे वाढवत आले आहे. लोणचे तयार करण्यासाठी जास्त प्रमाणात गावरान कैरीची मागणी असते. अनेक ठिकाणाहून कैऱ्या मागवून व्यापारी हकांची मागणी पूर्ण करतात. एप्रिल, मे, जूनमध्ये कैरीचे लोणचे घालण्याची पद्धत आहे.
पतीच्या व्यवसायाला पत्नीचे पाठबळ; कष्टाने दिली यशाची उंच झेप
तर लोणचे अधिक काळ टिकते
अक्षयतृतीया झाल्यानंतर लोणचे घातले की, ते अधिक काळ टिकते. गावरान आंबा उपलब्ध होत नसल्याने मार्केटमध्ये बाहेरून येणाऱ्या कैऱ्यांचे भाव वाढले आहेत. भाववाढ होऊनदेखील लोणच्यासाठी कैऱ्या घ्याव्याच लागतात. कारण, लोणचे हे जेवणाची लज्जत वाढवते. - सरोज सोनवणे, गृहिणी
अवकाळीचा परिणाम
• उन्हाळा सुरू झाला की, लोणचे बनवण्यासाठी कैऱ्यांची मागणी वाढत असते. यंदा नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे बाजारपेठेत कैरी येण्यास उशीर झाला आहे.
• दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच कैऱ्या बाजारपेठेत दाखल होत असतात. परंतु, अवकाळीमुळे उशीर झालेला आहे. अंबड शहरात इतर जिल्ह्यातूनदेखील कैरीची आवाक सुरु झाली आहे. लोणचे तयार करण्यासाठी कैरी खरेदीला महिला पसंती देत आहेत.