केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ (NCCF) आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (NAFED) यांना 20 जुलै 2023 पासून टोमॅटोला रु.70/- प्रति किलो या किरकोळ दराने विक्री करण्याचे निर्देश दिले आहेत.
NCCF आणि NAFED द्वारे खरेदी केलेले टोमॅटो सुरुवातीला रु.90/- प्रति किलो दराने विकले गेले होते आणि नंतर हे दर 16 जुलै, 2023 पासून ते रु.80/- प्रति किलोपर्यंत कमी केले गेले. हे दर 70/- किलोपर्यंत कमी केल्याने ग्राहकांना आणखी फायदा होईल, असे केंद्राचे म्हणणे असले तरी शेतकऱ्यांमध्ये भाव पडण्याच्या भीतीने असंतोष निर्माण होत आहे.
शेतकऱ्यांना वाटतेय भीती
कांद्याचे भाव नियंत्रित राहण्यासाठी नाफेड शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कांदा साठवून भाव वाढल्यानंतर बाजारात आणते. त्याच सुमारास शेतकऱ्यांचाही कांदा बाजारात येत असल्याने कांद्याचे भाव पडतात व शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्याच धर्तीवर टोमॅटोची खरेदी झाली व कमी किंमतीत माल बाजारात आणला, तर सध्या शेतकऱ्यांना मिळत असलेला भाव पडेल अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
टोमॅटो उत्पादन घेणाऱ्या नाशिक जिल्ह्यामधील वणी, दिंडोरी, नाशिक या पट्टयात सध्या व्यापारी शेतकऱ्यांकडून खरेदी करत आहेत. तसेच अनेक शेतकरी बाजार समित्यांमध्येही माल आणत असल्याने त्यांना तेथे तुलनेने बरा दर मिळत आहे. मात्र मागच्या काही दिवसात नाफेडच्या टोमॅटो खरेदीच्या घोषणेमुळे राज्यातील अनेक बाजारसमित्यांमध्ये आवक कमी असूनही किमान दर घटलेले दिसून आले असल्याचे चित्र आहे.
पिंपळगाव येथील आवक
१८ जुलै रोजी पिंपळगाव बसवंत बाजार समितीत २० क्विंटल टोमॅटोची आवक झाली, मात्र किमान दर अडीच रुपये प्रति किलो, तर कमाल दर ८७ रुपये प्रति किलो असा होता. १९ जुलै रोजी याच बाजारसमितीत टोमॅटोची ८ क्विंटल आवक होऊन किमान दर ३४ तर कमाल दर ६६ रुपये प्रति किलो असा होता. सध्या नाशिक शहरातील किरकोळ भाजीविक्रेते १६० ते १८० रुपये किलो प्रमाणे टोमॅटो विकत असून एका बाजूला शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला ग्राहकांचेही आर्थिक नुकसान होत आहे. राज्यातील इतर बाजारसमितीतही टोमॅटोचे किमान खरेदी दर घसरले असून ३० रुपयांवरून ५ ते दहा रुपये प्रति किलो असे ते आले असल्याचे महाराष्ट्र पणन महामंडळाने दिलेल्या बाजारभावांच्या यादीवरून समजते.
नाशिकमध्ये नाफेडची खरेदी नाही
नाफेडचे महत्त्वाचे खरेदी केंद्र असलेल्या पिंपळगाव बसवंत येथे दिनांक १९ जुलैपर्यंत नाफेडमार्फत कुठलीही टोमॅटो खरेदी झालेली नव्हती. लासलगाव येथेही नाफेडची खरेदी झालेली नव्हती. नाफेडने जरी खरेदी केंद्र सुरू केले, तरी शेतकऱ्यांना खुल्या मार्केटमध्ये जास्त भाव मिळत असल्याने ते या खरेदीकडे पाठ फिरवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. टोमॅटो हे नाशवंत असल्याने त्याचा साठा करण्यात नाफेडला अडचणी येतील, त्यामुळे नाफेडने खरेदी केलेला टोमॅटो त्यांना तातडीने बाजारात विकावा लागणार आहे. त्याचा शेतकऱ्यांच्या खरेदी किंमतीवर तसा परिणाम होणार नसल्याने सध्या तरी शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही, असे मत काही फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचे संचालक व्यक्त करत आहेत.
दिल्ली-एनसीआरमध्ये होणार विक्री
दरम्यान ग्राहक व्यवहार विभागाच्या निर्देशानुसार, NCCF आणि NAFED ने आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मंडईंमधून टोमॅटोची खरेदी एकाच वेळी अशा मुख्य ग्राहक केंद्रांमध्ये विकण्यासाठी सुरू केली होती, जिथे किरकोळ दर गेल्या एका महिन्यात सर्वाधिक वाढले होते. दिल्ली-एनसीआरमध्ये टोमॅटोची किरकोळ विक्री 14 जुलै 2023 पासून सुरू झाली होती. 18 जुलै 2023 पर्यंत दोन्ही एजन्सींद्वारे एकूण 391 मेट्रिक टन टोमॅटोची खरेदी करण्यात आली होती जी दिल्ली-एनसीआर, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार येथील मुख्य ग्राहक केंद्रांमध्ये ग्राहकांना सतत विकले जात आहेत.