गडहिंग्लज : नांदेड जिल्ह्यातून गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्रीला आलेल्या संकेश्वरी मिरचीला किलोला ८०० रुपये दर मिळाला.
बाजार समिती पदाधिकारी, अडत व्यापारी व मिरची खरेदीदारांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. येथील सौद्यात दुसऱ्या क्रमांकाचा भाव नांदेडच्या 'संकेश्वरी' मिरचीला मिळाला.
रोहा-पिंपळगाव (ता. मुदखेड, जि. नांदेड) येथील रामू शिंदे, बालाजी शिंदे, गणेश सोनटक्के व त्यांच्या सहकाऱ्यांनी येथील संकेश्वरी मिरचीची लागवड केली आहे.
त्या परिसरात या वाणाची माहिती नसल्यामुळे व गडहिंग्लजमध्ये 'संकेश्वरी'ला चांगली मागणी असल्याने पिकवलेली मिरची त्यांनी नांदेडहून येथील सौद्यात आणून विकली.
येथील विजयकुमार रामचंद्र मांडेकर आणि कंपनी यांच्या दुकानात सौदा झाला. निपाणीचे खरेदीदार जब्बार बागवान व कय्युम बागवान यांनी ही मिरची खरेदी केली.
गडहिंग्लज बाजार समितीचे अध्यक्ष रामदास पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच त्यांच्या भोजनाची व चहा-पानाची व्यवस्था करून आदरातिथ्यही केले. त्यामुळे नांदेडकर भारावून गेले.
यावेळी अडत व्यापारी रोहित मांडेकर, राजन जाधव, श्रीकांत चरटे, अरविंद आजरी, अमर मोर्ती, निखिल शहर, बाजार समितीचे सचिव बाळासाहेब चव्हाण, संदीप शेंडुरे, सागर खमलेट्टी आदीसह बाजारातील व्याप्यारी उपस्थित होते.
मिरचीची लागवडनांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 'सकेश्वरी' मिरचीला चांगली मागणी असल्याने शेतीमध्ये तिची लागवड केली होती. त्यानंतर विक्रीसाठी त्यांनी गडहिंग्लजमधील सौद्यात आणली. निपाणी येथील खरेदिदार बागवान यांनी खरेदी केली.
गडहिंग्लजपासून ७०० किलोमीटर दूरवरील आमच्या संकेश्वरी मिरची लागवडीच्या यशस्वी प्रयोगाची नोंद 'लोकमत'ने घेतली, त्यामुळे म्हणूनच आमची हिम्मत वाढली. त्याबद्दल 'लोकमत' सह लागवडीसाठी मार्गदर्शन करणारे रवी व कुमार घेज्जी, अडत व्यापारी मांडेकर, गडहिंग्लज बाजार समिती व मिरची खरेदीदारांचे आम्ही आभारी आहोत. - रामू शिंदे, रोही-पिंपळगाव, नांदेड