फ्लॉवर पिकाला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना नफा मिळू लागला आहे. वीस रुपये किलो या भावाने फ्लॉवर पीक विकले जात असून शेतकऱ्यांना अजून बाजार वाढण्याची अपेक्षा आहे. पाण्याचा तुटवडा भासत असताना अनेक शेतकरी फ्लॉवर पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे.
आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव, खडकी, निरगुडसर, पारगाव, काठापूर, लाखनगाव, लांडेवाडी, मंचर, अवसरी, कळंब, चास या परिसरात उन्हाळी हंगामात गेल्या काही वर्षांपासून फ्लॉवर या पिकाचे उत्पादन शेतकरी घेत आहेत.
यंदा चांगला दर पिकाला मिळत आहे. या परिसरात मध्य भागातून घोडनदी वाहत असल्यामुळे येथे बाराही महिने पाण्याची उपलब्धता होते. या गावात उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असलेला शेती हा परंपरागत व्यवसाय. तो जोपासण्यासाठी हा शेतकरी जिवाचे रान करतो.
या व्यवसायातून आपल्या किमान गरजा पूर्ण होतील, या अपेक्षेने तो शेतात सतत घाम गाळत असतो. या घामाचा योग्य मोबदला मिळावा हा त्याचा प्रामाणिक हेतू असतो. वास्तविक फ्लॉवर हे पीक तिन्हीही हंगामात घेता येते. याच्या उत्पादनासाठी जमीन चांगल्या प्रतीची लागते.
उन्हाळी हंगामात ६० ते ६५ दिवसांत हे पीक काढणीस येते. उन्हाळा असल्याने जमिनीतील उष्णतेमुळे आतील किटाणू मरतात. त्यामुळे शक्यतो या पिकांवर रोगराई पडत नाही. काही पिकांचे वाण लवकर, तर काही वाण उशिरा येतात.
एक एकर क्षेत्राला सुमारे ५० हजार रुपये खर्च येतो. फ्लॉवर रोपे, लागवड खुरपणी औषध फवारणी त्याची देखभाल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते.
जवळे येथील शेतकरी राजेंद्र खालकर यांनी दोन एकर क्षेत्रात फ्लॉवर पीक घेतले होते. लागवडीपासून पीक काढणीपर्यंत सुमारे ६० हजार रुपये खर्च झाला. पाच लाख रुपये त्याला निव्वळ नफा राहिला.
उन्हाळ्यात पाण्याचा अंदाज घेऊन शेती करत असल्यामुळे ती आपल्याला फायदेशीर ठरत आहे. उन्हाळी हंगामात फ्लॉवर पीक घेतले जाते. दोन ते अडीच महिन्यांत हे पीक निघते. या परिसरातील शेतकऱ्यांनी प्रत्येकी एक ते दोन एकर क्षेत्रात फ्लॉवर हे पीक घेतले आहे. सध्या प्रति किलोला २० ते २५ रुपये बाजारभाव मिळत आहे. येथील शेतकऱ्यांच्या बांधावर थेट व्यापारी येत असून सौदा करीत आहे. काही शेतकरी पुणे-मुंबई येथे पीक विक्रीसाठी पाठवत आहे. - नीलेश थोरात, संचालक, मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती
फ्लॉवर पिकाला चांगला बाजारभाव मिळू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे राहतील. तसे पाहिले तर नगदी पिकांच्या भांडवली खर्चात वाढ झाली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेला भांडवली खर्च त्या तुलनेत कमी बाजारभाव मिळाल्यास शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. फ्लॉवरचे बाजारभाव वाढल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. - बाळासाहेब पिंगळे, शेतकरी श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग