जळगाव जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या रेशीम (तुती) कोषांना आता सोन्याच्या तुलनेत भाव मिळू लागला आहे. रेशीमच्या दर्जेदार कोषाला ७० हजार रुपये प्रति क्विंटल भाव सध्या आहे, तर सरासरी कोषाला ५२ हजारांपेक्षाही जास्त भाव मिळत आहे. त्यामुळे पाचशेवर लागवड धारकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
रेशीम शेतीला पाणी कमी लागते भाव चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा या व्यवसायाकडे कल वाढला. केळी, कापूस लागवडीचा जिल्हा जळगाव ओळखला जातो. दोन दशकांपासून जळगावकरांनी कमी जागेत, कमी पाण्यात, जास्त कष्ट करून रेशीम उद्योगाला चालना दिली. एक एकरपासून ते साडेतीन, चार एकरांमध्ये रेशीम शेती फुलवून नवा पाया रचला आहे.
भाव वाढताच....
यंदा रेशीमला प्रति क्विंटल ४० ते ५० हजार रुपये भाव जानेवारी ते मार्च दरम्यान होता, एप्रिल ते जून दरम्यान हा भाव ६० हजारांवर गेला. जुलै ते सप्टेंबर मध्ये भाग गडगडले आणि ५० हजारांवर आले. मात्र, ऑगस्ट पासून तेजी आली आणि डिसेंबर मध्ये रेशीम ७० हजारांवर गेले.
अर्थकारण उंचावले
मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण रेशीम शेतीतून उंचावले आहे. प्रति १०० अंडी पुंजांमागे ८० ते ९० किलो व कमाल १०० किलोपर्यंत कोष उत्पादन मिळते आहे. प्रति किलो ३५० ते ४०० रुपये वा त्याहून अधिक दर मिळत असल्याने हाती समाधानकारक उत्पन्न पडत आहे.
महिन्याच्या तयारीसाठी जिल्हा रेशीम उद्योग विभागाकडून पुढच्या आठवड्यापासून महारेशीम अभियान सुरू आहे. या अभियानात शेतकऱ्यांनी नावनोंदणी करून घ्यावी, सभासदत्व मिळणार आहे. त्यालाच पुढे रेशीम उद्योगासाठी ४ लाख १८ हजारांपर्यंत अनुदानही प्राप्त होते. - पवन कळमकर, वरिष्ठ सहायक, जळगाव जिल्हा रेशीम विभाग.
जिल्ह्यातील डिसेंबरपर्यंतची रेशीम लागवड (क्षेत्र एकरात)
तालुका | शेतकरी | क्षेत्र |
अमळनेर | १७ | २४ |
भडगाव | २१ | २४ |
भुसावळ | ०६ | ०७ |
बोदवड | १९ | २५ |
चाळीसगाव | २२ | २६ |
चोपडा | ३८ | ४१ |
धरणगाव | ४० | ५१ |
एरंडोल | १० | १५ |
जळगाव | ३२ | ३९ |
जामनेर | ९२ | ९८ |
मुक्ताईनगर | ०३ | ०५ |
पाचोरा | १६ | १९ |
पारोळा | ३७ | ४२ |
रावेर | ०४ | ०५ |
यावल | ५७ | ६५ |
एकूण | ४१६ | ४८८ |