भारतीय शेअर बाजारात म्हणजेच बीएसई मध्ये नोंदणीकृत असलेल्या खासगी साखर कारखान्यांचे शेअर्स सुमारे ३ टक्के घसरले आहेत.
त्यात राणा शुगर्सचे शेअर्स गुरुवारी सकाळच्या व्यवहारात 3.21 टक्क्यांनी घसरून 25.35 रुपयांवर, मवाना शुगर्सचे शेअर्स 2.81 टक्क्यांनी घसरून 101.70 रुपयांवर, राजश्री शुगर्स अँड केमिकल्सचे शेअर्स 2.50 टक्क्यांनी घसरून 72.62 रुपयांवर, रेणुका शुगर्सचे श्री रेणुका शेअर्स ही घसरले, ते 2.41 टक्के घसरून 48.50 रुपये इतके झाले, केसीपी शुगर अँड इंडस्ट्रीज 2.20 टक्क्यांनी घसरून 40.87 रुपये आणि ईआयडी पेरी (इंडिया) 1.57 टक्क्यांनी घसरून 629.20 रुपयांवर आले.
दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीजचे शेअर्स 1.15 टक्क्यांनी घसरून 403.15 रुपये, बलरामपूर शुगर मिल्सचे शेअर 1.12 टक्क्यांनी घसरून 376.50 रुपयांवर, धामपूर शुगर मिल्सचे शेअर्स 0.96 टक्क्यांनी घसरून 248 रुपयांवर आले आहेत.
दरम्यान केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीत प्रतिटन आठ टक्के म्हणजेच २२५ रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय बुधवारी रात्री घेतला. २०२४-२५ या साखर हंगामासाठी १०.२५ टक्के उताऱ्याला प्रतिटन ३४०० रुपये दर मिळणार आहे. यामुळे शेतकरी खुश झाला असला तरी ही वाढीव एफआरपी कशी द्यायची या प्रश्नाने साखर उद्योग मात्र, अस्वस्थ झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत एफआरपी वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. १०.२५ टक्के उताऱ्याला प्रतिटन ३४०० रुपये दर, त्यापुढील प्रत्येक टक्क्याला ३३२ रुपये वाढीव दर देण्यात येईल. तसेच ९.३० टक्के उतारा असलेल्या उसाला ३१५१ रुपये निश्चित दर देण्याला मंजुरी देण्यात आली.