सागर कुटे
मागील काही दिवसांपासून हमीभावाने तूर खरेदीला प्रारंभ झाला आहे; मात्र खुल्या बाजारात दर सारखेच मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रांकडे पाठ फिरविली आहे. (Shetmal BajarBhav)
दुसरीकडे बाजारात कमी दर असलेल्या हरभऱ्याची नोंदणी सुरू होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे, परंतु, अद्याप आदेश देण्यात आले नाहीत.
दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला सर्वोच्च ११ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. त्यामुळे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे ओढा वाढला आहे. (Shetmal BajarBhav)
बाजारात सोयाबीनला दर नसल्याने शेतकऱ्यांनी नाफेड खरेदीला पसंती दिली. तुरीला बाजारात चांगले दर असल्याने हमीभावाने खरेदी सुरू झाल्यानंतरही शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
तूर विक्रीसाठी ५,८४० शेतकऱ्यांची नोंदणी
* राज्य शासनाने दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन मार्फत बुलढाणा जिल्ह्यात तूर खरेदीसाठी २६ केंद्र सुरू केले आहेत.
* या केंद्रामध्ये आतापर्यंत ५ हजार ८४० शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. तूर खरेदीला प्रारंभ झाला असून, शेतकरी पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.
* तुरीची काढणी पूर्ण झाली आहे. सध्या हमीभाव केंद्राच्या बरोबरीत बाजारात दर मिळत असल्याने बहुतांश शेतकरी हमीभाव केंद्राकडे पाठ फिरवित आहे.
यंदा उत्पादनात घट !
जिल्ह्यातील विविध भागांत तुरीच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. त्याचा थेट परिणाम बाजारातील आवकेवर होत आहे. शेतकरी तूर विक्री करताना गरज पडली तरच तूर विक्रीला प्राधान्य देत आहे.
शेतकऱ्यांना तुरीचे दर दहा हजारांच्या पुढे जातील अशी आशा आहे. दुसरीकडे हरभऱ्याचे दर वाढत नसल्याने तुरीच्या ऐवजी हरभरा विक्रीला गरज भागविण्यासाठी शेतकरी प्राधान्य देत असल्याचाही परिणाम तूर खरेदीवर होतो आहे.
तुरीला हमीदर ७५५० रुपयेबाजारात दर ७४२५ रुपयेहरभऱ्याला हमीदर ५६६० रुपयेबाजारात दर ५४५० रुपये
खामगाव बाजार समितीत आवक घटली!
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक घटली आहे. दरम्यान, शुक्रवारी गहू ५२३, तूर ४,३७९, हरभरा ४,९३८, सोयाबीनची ३,२०५ क्विंटल आवक झाली होती. एकूण १३ हजार ४५४ क्विंटल शेतमालाची आवक होती.
२० शेतकऱ्यांकडून २८० क्विंटल तूर खरेदी, जिल्ह्यातील बिबी, मारोतीपेठ, सिंदखेड राजा व गोरेगाव या केवळ चार केंद्रांमध्ये २० शेतकऱ्यांकडून २८० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.