Join us

Shevga Bajar Bhav : शेवग्याची बाजारात चलती मिळतोय रेकॉर्ड ब्रेक बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 19:47 IST

मागणीच्या तुलनेत शेवग्याची आवक कमी होत असल्याने किरकोळ बाजारात एक किलो शेवग्याला प्रतवारीनुसार ५०० ते ६०० रुपये मोजावे लागत आहेत.

पुणे : मागणीच्या तुलनेत शेवग्याची आवक कमी होत असल्याने किरकोळ बाजारात एक किलो शेवग्याला प्रतवारीनुसार ५०० ते ६०० रुपये मोजावे लागत आहेत.

शेवगा उष्ण असल्याने थंडीत मागणी वाढते.किरकोळ बाजारात पावशेर शेवग्याचे दर १२० ते १५० रुपये आहेत. परिणामी जेवणाच्या डब्यातून आणि सांबारमधून शेवगा गायब झाला आहे.

दक्षिणेकडील राज्यात झालेल्या पावसामुळे शेवगा लागवडीला मोठा फटका बसला. पुणे, मुंबई, ठाण्यासह वेगवेगळ्या शहरातील बाजारात शेवग्याची आवक कमी झाली आहे.

शेवग्याची सर्वाधिक लागवड तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात होते. गुजरात, तसेच पुणे विभागातून शेवग्याची आवक होते. १०० ते १२० रुपये किलो भाव असणारा शेवगा ५०० ते ६०० रुपये किलो मिळत आहे.

मार्केट यार्डातील घाऊक बाजारात तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातून २ टेम्पो शेवग्याची आवक झाली. एरवी दक्षिणेतून ५ ते ६ टेम्पो आवक होते. गुजरातसह सोलापूर जिल्ह्यातून शेवग्याची तुरळक आवक होत आहे.

एरवी बाजारात रोज ४ ते ५ टन शेवग्याची आवक होत होती. सध्या मार्केट यार्डातील घाऊक बाजारात ७०० ते ८०० किलो शेवग्याची आवक होत आहे. डिसेंबरअखेरीस आवक टप्प्याटप्प्याने वाढेल, त्यानंतर दरात घट होईल.

शेवग्याची आवक कमी प्रमाणावर होत आहे. थंडीमुळे शेवग्याची तोड होत नाही. हॉटेल व्यावसायिकांकडून शेवग्याला सर्वाधिक मागणी असते. आवक पूर्ववत झाल्यानंतर भाव कमी होतील. - विलास भुजबळ, माजी अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते संघटना

अधिक वाचा: Farmer Success Story : डबल उच्च पदवीधारकाने प्राध्यापकाची नोकरी सोडून शेती करत केली केळी एक्सपोर्ट

टॅग्स :भाज्याबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपुणेतामिळनाडूगुजरात