Join us

सोयाबीन घरात ठेवावे की कमी भावात विकावे ? शेतकरी विवंचनेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 3:09 PM

प्रतीक्षा करूनही सोयाबीनचे भाव काही वाढेनात

खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून सोयाबीनची ओळख असून, सर्वच शेतकरीसोयाबीनचे पीक घेतात. त्यामुळे या शेतमालाची उत्पादकता सर्वाधिक आहे. असे असताना दरवर्षीप्रमाणे यंदाही सोयाबीनला अपेक्षित दर मिळणे अवघड झाले आहे. प्रतीक्षा करूनही भाव वाढत नसल्याने सोयाबीन घरात ठेवावे की विकून मोकळे व्हावे, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.

नगदी आणि हमखास पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनची तालुक्यामध्ये सर्वाधिक क्षेत्रावर लागवड केली जाते. ज्यांना पैशांची नितांत गरज आहे ते शेतकरी हंगाम संपताच मिळेल त्या भावात सोयाबीन विकून मोकळे होतात. तर काही शेतकरी भाववाढ होईल, या अपेक्षेने सोयाबीन राखून ठेवतात. त्यानुसार यंदाही अनेक शेतकऱ्यांनी घरी व गोदामांमध्ये सोयाबीन साठवून ठेवले होते. मात्र, रब्बी हंगाम संपल्यानंतरही सोयाबीनच्या दरात वाढ होत नसल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

सत्तर दिवसांत एक एकर टरबूज मधून शेतकऱ्याला १ लाख ३५ हजारांचा निव्वळ नफा

मोंढ्यात सोयाबीनची आवक मंदावली

खरीप हंगाम साधारणत ऑक्टोबर महिन्यात संपुष्टात येतो तर नोव्हेंबरपासून सोयाबीनची बाजार समित्यांमध्ये आवक वाढायला लागते. असे असले तरी बाजार समितीमध्ये मात्र बाराही महिने अन्य शेतमालांच्या तुलनेत सोयाबीनचीच सर्वाधिक आवक असते. ४ एप्रिल रोजी बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या १ हजार कट्ट्यांची आवक आली होती. मात्र अपेक्षित दर मिळत शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

सोयाबीनचे दर ४५०० च्या वर चढेनात

लागवड खर्चाच्या तुलनेत सोयाबीनला किमान ५५०० ते ६००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र सोयाबीनचे दर ४५०० रुपये प्रतिक्विंटलच्यावर चालले नसल्याचे दिसत आहे. हे दर परवडणारे नसले तरी ज्यांना पैशांची गरज आहे, अशा शेतकऱ्यांकडून सोयाबीनची विक्री करणे सुरू आहे.

साहेब थोडे तरी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे

सध्या शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उसनवारी शेतकऱ्यांकडे अधिक झाली आहे. अशा परिस्थितीत सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. पण कोणीही लक्ष देत नाही. - संजय इंगोले, शेतकरी

खरीप हंगामापासून शेतकरी एक नाही तर अनेक संकटांचा सामना करत आला आहे. अशा परिस्थितीत सरकारनेच आर्थिक मदत करायला पाहिजे. सध्या सोयाबीन शेतकऱ्यांजवळ आहे. पण भाव मिळत नाही. त्यामुळे घरातच ठेवून दिले आहे. - केशव चांदणे, शेतकरी

टॅग्स :सोयाबीनबाजारशेतीशेतकरीमहाराष्ट्र