Join us

राज्याच्या 'या' बाजारात समितीत चाळणी कटती थांबणार; कृउबा समितीने काढले पत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 14:02 IST

Market Yard : सिल्लोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतमालाची प्रतिक्विंटलमागे २ ते ३ किलोची होणारी कपात (चाळणी कटती) बंद करण्याचा निर्णय शनिवारी एका पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतमालाची प्रतिक्विंटलमागे २ ते ३ किलोची होणारी कपात (चाळणी कटती) बंद करण्याचा निर्णय शनिवारी एका पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सिल्लोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालातील प्रतिक्विंटलमागे २ ते ३ किलो धान्य स्थानिक व्यापाऱ्यांकडून कट्टीच्या नावाखाली काढून घेण्यात येत होते. गेल्या अनेक वर्षांपासून या माध्यमातून चाळणी कटतीच्या नावाखाली पोत्याचे वजन आणि शेतमालातील मातेरे आहे असे म्हणून शेतकऱ्यांची लूट होत होती.

याबाबत शेतकऱ्यांनी नुकतीच बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर बाजार समितीने या अनुषंगाने शनिवारी एक पत्र काढले असून, त्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाची व्यापाऱ्यांकडून होणारी कपात बंद करण्यात येत आहे, असे जाहीर करण्यात आले आहे.

सिल्लोड व सोयगाव या दोन्ही तालुक्यांत कोणत्याही गावात व्यापाऱ्यांनी शेतमालाची कपात केली तर कृषी उत्पन्न बाजार समिती त्या व्यापाऱ्याविरोधात फौजदारी कारवाई करेल, तसेच सदरील व्यापाऱ्याचा परवाना रद्द केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

तसेच शेतकऱ्यांनीही शेतमाल विक्री करताना शेतमालाच्या वजनात कोणत्याही व्यापाऱ्याने क्विंटलला २ ते ३ किलो धान्याची कपात केल्यास बाजार समितीकडे लेखी तक्रार करावी. बाजार समिती याबाबत कारवाई करेल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना लुटण्याची अनिष्ट प्रथा

काही बाजार समित्यांमध्ये काही प्रमाणात हत्ता पद्धती (रुमालाखाली होणारे व्यवहार), नमुना काढणे, अंदाजे आद्रता पाहून भाव कमी करणे, शेतमालाचे अंदाजे वजन करणे अशा अनेक अनिष्ट प्रथा बाजार समित्यांमध्ये सुरू आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट होत असताना या प्रथा बंद करण्यासाठी बाजार समित्या पुढाकार घेत नसल्याचे समोर आले आहे.

गंगापूर, लासूर स्टेशन कृउबामध्ये कपात सुरूच

• सिल्लोड बाजार समितीने १ मार्च रोजी पत्र काढून शेतकऱ्यांच्या शेतमालाची कपात बंद केली असली तरी गंगापूर आणि लासूर स्टेशन बाजार समितीमध्ये मात्र प्रति क्विंटलमागे १ किलो धान्याची चाळणी कटतीच्या नावाखाली कपात केली जाते.

• कन्नड बाजार समितीने ५ 3 वर्षापूर्वीच ही प्रथा बंद केली आहे. वैजापूर, पैठण, फुलंब्री आणि छत्रपती संभाजीनगर या बाजार समित्यांमध्ये अनेक वर्षांपासून ही प्रथा बंद असल्याची माहिती मिळाली.

कटती केल्यास व्यापाऱ्यांवर होणार कारवाई

२ ते ३ किलो धान्य व्यापारी क्विंटलमागे चाळणी कटती म्हणून काढून घेत होते. या निर्णयानंतर हा प्रकार थांबणार असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा : पाच महिन्यांत ३० गुंठ्यांमध्ये घेतले ५ लाख रुपयांचे उत्पन्न; गावरान लसणाचा यशस्वी अंकुश पॅटर्न

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारछत्रपती संभाजीनगरशेतकरीशेतीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्ड