वाल्हे पुरंदर तालुक्यातील सीताफळ हे देशभरात प्रसिद्ध आहे. तालुक्यातील सीताफळ पावसाळी बहार सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. पावसामुळे येथील सीताफळावरील चमक गेली आहे.
त्यामुळे बाजारात या सीताफळाला समाधानकारक दर मिळत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. तर मान्सूनोत्तर पावसामुळे सीताफळाच्या झाडावरील पाने गळून पडली आहेत.
सीताफळाला पावसाचा थेट मारा बसल्याने अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. परिणामी सीताफळ उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, पावसातील खंड, अचानक पडलेला पाऊस अन् बदलत्या वातावरणाचाही सीताफळाच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे.
बाजारातील वाढलेली आवक, फळांची ढासळलेली गुणवत्ता यामुळे बाजारातील दरही अपेक्षित मिळत नाहीत.
वाल्हे व परिसरात चांगल्या प्रतीच्या सीताफळांच्या २० किलोच्या क्रेटला १००० रुपयांपासून ते किमान १०० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहेत.
सीताफळाला समाधानकारक दर मिळत नसल्याने सीताफळ उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत.
मागील दीड-दोन महिन्यांत तालुक्यातील काही भागात जास्त पाऊस झाल्यामुळे, उशिरा झाडाला लागलेला सीताफळाचा माल त्या दर्जाचा राहिला नाही. सीताफळाचा माल जूनपासूनच सुरू झाला होता. पण आता शेवटच्या टप्प्यामध्ये झाडावर माल कमी राहिला आहे. पावसामुळे झाडावर पाने राहिली नाहीत. त्यामुळे फिनिशिंग राहिली नाही; पावसाने झोडपल्यामुळे काही सीताफळ काळे पडून, तेज राहिले नाही. - संभाजी पवार, सीताफळ उत्पादक शेतकरी.
गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्रोत्सवात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती. यानंतर सलग चार-पाच दिवस रात्रीचा पाऊस काही प्रमाणात पडला होता. या पावसामुळे कमी कालावधीमध्ये सीताफळ तयार झाली; त्यामुळे बरेचसे क्रॅकिंगही झाले. या कारणामुळे बाजारात आवक वाढली आणि शेतकऱ्यांना कमी दर मिळू लागला आहे. - गुणवंत राऊत, सीताफळ व्यापारी