जालना : शहरातील विविध बाजारपेठांत सीताफळांची आवक मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. परिणामी सीताफळ स्वस्त झाले आहेत. सततच्या पावसाचा सीताफळ बागांना एकीकडे फटका बसला तर दुसरीकडे डोंगरातील सीताफळांना याचा फायदा झाला. बाजारात सध्या गावरान सीताफळांची मोठी आवक होत आहे.
वातावरणात थंडी हळूहळू वाढू लागली असून, सीताफळांचा गोडवा वाढू लागल्याचे दिसून येत आहे. सीताफळ हे हाडांसाठी फायदेशीर आहे. सीताफळात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस हे घटक असल्याने हाडांसाठी हे फळ अतिशय फायदेशीर असते. थंडीच्या दिवसांत हाडे दुखण्याचे किंवा सांधेदुखीचे प्रमाण वाढते. त्यावर सीताफळ खाणे फायदेशीर ठरते.
गावरान सीताफळ अधिक गेल्या वर्षी गावरान सीताफळाची आवक कमी होती. तर, गोल्डन सीताफळाची आवक जास्त होती. यावर्षी मृग बहरात सीताफळांना जुलै महिन्यात फुले येतात. नेमक्या याच काळात संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे फळधारणा होण्याच्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे सीताफळ बागांचे उत्पादन घटले. म्हणून बाजारात गोल्डन सीताफळ कमी प्रमाणात असल्याचे फळ व्यापारी यांनी सांगितले आहे.
मागील वर्षी कमी पावसामुळे सिताफळाची आवक कमी झाली होती. यामुळे जालना शहरातील बाजारपेठेत सिताफळांना मोठी मागणी आली होती. मागील वर्षी सिताफळांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले होते. परंतु, यंदा जालना जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने सिताफळांचे उत्पादन वाढले आहे.
दर का घसरले?
• सीताफळाचा हंगाम जून ते जानेवारीदरम्यान तीन बहरांत असतो. जून ते ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, अंतिम बहार हा जानेवारी आणि फेब्रुवारीचा असतो.
• सध्या जून ते ऑक्टोबरचा बहर बाजारात आला असून, उत्पादनवाढीमुळे दरात घसरण झाली आहे.
• गेल्या पंधरा दिवसांपासून आवक वाढल्याने बाजारात तीस ते साठ रुपये किलो दराने सीताफळांची विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
• क्विंटलमागे चार हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला, तर बाजारात ३० ते ६० रुपये प्रति किलोदराने त्यांची विक्री होत आहे.
मागील वर्षी आवक कमी
मागील वर्षी जालना जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळी स्थिती होती. यामुळे गावरान सिताफळांचे उत्पादन कमी झाले होते. परिणामी बाजारपेठेत आवक देखील मंदावली होती. परिणामी सिताफळांचे दर देखील वाढले होते. यंदा ऑक्टोंबर महिन्यात सिताफळांची आवक वाढल्याने दर देखील कमी झाले आहेत.
कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील सीताफळ आवक व दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
21/10/2024 | ||||||
पुणे-मांजरी | --- | क्विंटल | 5 | 2000 | 2500 | 2200 |
छत्रपती संभाजीनगर | --- | क्विंटल | 52 | 1200 | 3500 | 2350 |
मुंबई - फ्रुट मार्केट | --- | क्विंटल | 27 | 5000 | 8000 | 6500 |
श्रीरामपूर | --- | क्विंटल | 3 | 1000 | 2000 | 1500 |
राहता | --- | क्विंटल | 60 | 500 | 5500 | 4500 |
सोलापूर | लोकल | क्विंटल | 910 | 800 | 4000 | 2000 |
नाशिक | लोकल | क्विंटल | 207 | 3000 | 4000 | 3500 |
सांगली -फळे भाजीपाला | लोकल | क्विंटल | 58 | 2000 | 4000 | 3000 |
पुणे | लोकल | क्विंटल | 638 | 1000 | 6000 | 3500 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 13 | 2000 | 3000 | 2500 |
आटपाडी | लोकल | क्विंटल | 3 | 500 | 3000 | 1700 |
संगमनेर | नं. १ | क्विंटल | 113 | 4000 | 9000 | 6500 |